'रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली', विनायक राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:22 IST2022-09-29T13:20:38+5:302022-09-29T13:22:23+5:30
'रामदास कदम जी बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही.'

'रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली', विनायक राऊतांचा हल्लाबोल
मुंबई: शिंदे गटाने (Shinde Gruop) बंड केल्यापासून ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर, ते निशण्यावर आहेत. आता शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. 'शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. तसेच, त्यांनी यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचाही एक किस्सा सांगितला.
'नारायण राणे शिवसेना सोडून जात चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते,' असा आरोपही विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केले ते जनतेला सांगावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.