Vikram Gokhale: शाहरुख अन् आर्यन खान माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत – विक्रम गोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 00:01 IST2021-11-15T00:00:43+5:302021-11-15T00:01:17+5:30
जर एखादा २१ वर्षीय सैनिक देशासाठी बॉर्डरवर गोळी लागून शहीद होतो तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही असं स्पष्ट मत विक्रम गोखलेंनी व्यक्त केले आहे.

Vikram Gokhale: शाहरुख अन् आर्यन खान माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत – विक्रम गोखले
पुणे – अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वक्तव्याला पाठिंबा देऊन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही वादात उडी घेतली आहे. कंगनानं जे विधान केले ते बरोबर आहे. मी त्याचं समर्थन करतो असं विक्रम गोखले म्हणाले. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्याचसोबत विक्रम गोखले(Vikram Gokhale) यांनी शाहरुख खान आणि आर्यन खानवरही(Aryan Khan) निशाणा साधला आहे.
मुंबई क्रुझवरील छापेमारीबाबत विक्रम गोखले म्हणाले की, जर एखादा २१ वर्षीय सैनिक देशासाठी बॉर्डरवर गोळी लागून शहीद होतो तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही. शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्याचसोबत कंगना बोलतेय ते खरं आहे. कोणाच्या मदतीनं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ते भिकेतच मिळालंय. आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा कुणी त्यांना फाशीपासून वाचवलं नाही हे चुकीचं आहे असं ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारण विचित्र स्तरावर पोहचले
बाळासाहेब ठाकरे हे माझे मामे सासरे होते. माझी सख्खी आत्येसासू ही शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती. मी ४० वर्ष बाळासाहेबांचे भाषण ऐकतोय. त्यांच्या निधनानंतर राजकारण विचित्र स्तरावर पोहचले. मराठी माणूस हा भरडला जातोय. लोकं अस्वस्थ आहेत त्याची तुम्हाला कल्पना नाही. आमच्यासारखी माणसं फिरत असतात. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की, गणित चुकलेले आहे. सुधारायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना-भाजपानं(Shivsena-BJP) एकत्र आलेच पाहिजे अशी भूमिकाही अभिनेते विक्रम गोखले यांनी मांडली.
नरेंद्र मोदी माझे आदर्श नायक
पक्षाचं काम सगळे करतात पण देशासाठी नरेंद्र मोदी(Narendra Modi) जेव्हा उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. मोदी पक्षाच्या बाजूने काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही. महागाई काय मोदींनी वाढवली आहे का? एक व्यक्ती गेल्या ७० वर्षापासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे. त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही का? असा सवालही विक्रम गोखलेंनी विचारला.