सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2025 00:06 IST2025-07-22T00:05:59+5:302025-07-22T00:06:47+5:30
Manoj Jarange-Patil News: ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना केलेल्या मारहाणीमागे राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा लातुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला.

सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
- राजकुमार जाेंधळे
लातूर - ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना केलेल्या मारहाणीमागे राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा लातुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला.
ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पत्रपरिषदेत जरांगे-पाटील म्हणाले, ज्यावेळी अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले झाले, तेव्हा त्यांना चीड आली नाही. परंतु, लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रपरिषदेत पत्ते टाकल्यानंतर इतका राग का यावा. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढायचे नाही का, असा सवाल करीत अजितदादांनी आता लक्ष घालावे, अन्यथा जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ॲड. घाडगे-पाटील यांना केलेली मारहाण जाणीवपूर्वक आहे. ते गंभीर जखमी आहेत. मारहाण करणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. नव्याने जबाब घेऊन पुरवणी एफआयआर करा, घाडगे यांना एका डोळ्याने कमी दिसत आहे.
उग्र आंदोलने नको; लोकशाही मार्गानेच जाऊ...
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, लोकशाही मार्गानेच उत्तर दिले जाईल. कार्यकर्त्यांनी संयम पाळावे, उग्र आंदोलने नको. तत्पूर्वी ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील म्हणाले, मला झालेली मारहाण पूर्वनियोजितच आहे. एकट्या सूरज चव्हाणचा विषय नाही, त्यामागे कट आहे. इतर अनेकजण होते. त्यांच्या हातात कडे आणि फायटर होते. ज्यामुळे मला जबर मार लागला. मी जखमी झालो आहे.