मुंबई: विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रहाटकर यांनी आज संध्याकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या साडे तीन वर्षापासून त्या पदावर कार्यरत होत्या. एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबद्दल टिप्पणी केली होती. अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही, अशी विचारणा न्यायालयानं केली होती. त्यावर महिला आयोगाचं अध्यक्षपद अराजकीय स्वरुपाचं असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर. बानूमती आणि न्या. ए. एस. बोपण्णा यांच्यासमोर सुनावणी झाली. विजया रहाटकर यांच्या याचिकेत उपस्थित केलेले कायदेशीर मुद्दे न्यायालयाच्या विचाराधीन राहतील, असा निकाल न्या. बानूमती व न्या. बोपण्णा यांनी दिला. "आजच्या निकालाने आयोगाच्या कायद्याचे आणि त्यातील तरतुदींचे महत्व अधोरेखित झाले आहे. राज्य सरकारला कार्यवाही करताना या कायद्याची दखल घ्यावी लागेल," अशी टिप्पणी रहाटकर यांची बाजू मांडणारे अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी केली होती.
विजया रहाटकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 21:54 IST