OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:01 IST2024-06-20T16:01:24+5:302024-06-20T16:01:59+5:30
जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला ओबीसी समाजातील विविध नेते पोहचत आहे.

OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन
जालना - गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. याठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाची दखल सरकार घ्यावी अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यासाठी मराठवाड्यात काही भागात रास्ता रोकोही करण्यात आला. आज वडेट्टीवारांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी ओबीसी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत विजय वडेट्टीवारांनी व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचा फोन वडेट्टीवारांनी स्पीकरवर ठेवला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी पहिल्यापासून सरकारने घेतली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे आमचे शब्द आजही कायम आहेत आणि पुढेही कायम राहतील. उपोषणकर्त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले.
तर माझं तुमच्याशी बोलणं झाल्याप्रमाणे सरकारकडून २ मंत्री पाठवा, आमच्या ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगेसोयरे यावरून आहे. त्यावर तुम्ही आश्वासन द्यावं. सगेसोयरेबाबत सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार नाही असं तुमचेच मंत्री गिरीश महाजन म्हणालेत, त्यामुळे सरकारकडून लेखी आश्वासन ओबीसींना द्यावे त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या मागण्या समजून घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ उद्या पाठवतो, ते उपोषणकर्त्यांची चर्चा करतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांच्या फोनवरून दिले आहे. एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागे उभं राहावे हे माझं कर्तव्य आहे. ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीतून मी कुठेही मागे येणार नाही. सत्ता आणि पद येत जात असतात. मंत्री असतानाही त्याची पर्वा न करता समाजाच्या पाठीशी उभा राहिलो आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याची भीती वाटते असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.