विजय माल्ल्याला भारतात आणणं अवघड : उज्ज्वल निकम
By Admin | Updated: April 18, 2017 18:16 IST2017-04-18T18:12:19+5:302017-04-18T18:16:21+5:30
भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड

विजय माल्ल्याला भारतात आणणं अवघड : उज्ज्वल निकम
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि.18 - भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. माल्ल्याला लंडनमध्ये आज अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
""विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे. तेथील न्यायालयात आपल्या तपास यंत्रणेचे पुरावे टिकत नाहीत, तिथला गुन्हेगार हस्तांतरण कायदा किचकट आहे. गुलशन कुमार हत्याकांडात नदीम सैफ याच्याबाबत मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार गुन्हा होत असला तरी तो ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा ठरतो असे नाही, त्यामुळे माल्ल्याला भारतात आणणं कठीण आहे"". कोपर्डी खटल्याच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम अाज अहमदनगर आले होते.
भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये आहे. विजय मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज अटक केली होती, मात्र काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरोधात दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले होते.