विधानपरिषद निवडणूक, मुंबईतून रामदास कदम, भाई जगताप, कोल्हापूरातून सतेज पाटील विजयी
By Admin | Updated: December 30, 2015 13:00 IST2015-12-30T08:34:44+5:302015-12-30T13:00:35+5:30
मुंबईतील विधानपरिषदेच्या दोन जागांचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले आहेत.

विधानपरिषद निवडणूक, मुंबईतून रामदास कदम, भाई जगताप, कोल्हापूरातून सतेज पाटील विजयी
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३० - विधानपरिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सात पैकी तीन जागांवर काँग्रेस विजय मिळवला, शिवसेनेने दोन तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. दोन जागा असताना तीन उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झालेल्या मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले.
प्रसाद लाड यांचा अवघ्या दोन मतांनी निसटता पराभव झाला. त्यांना ५६ मते मिळाली. रामदास कदम यांना ८५ मते मिळाली तर, भाई जगताप यांना ५८ मते मिळाली. मुंबई महापालिकेत शिवसेनेच सर्वाधिक नगरसेवक असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता. खरी चुरस दुस-या जागेसाठी होती.
पडद्यापाठून भाजपने मदतीचा हात दिल्यामुळे प्रसाद लाड यांनी ५६ मतांपर्यंत मजल मारली अशी चर्चा राजकीत वर्तुळात सुरु आहे. निकालानंतर प्रसाद लाड यांनी पराभव मान्य करुन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
मुंबई पाठोपाठ सर्वांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला.
धुळे-नंदुरबार मतदारसंघातून काँग्रसचे अमरीश पटेल सहज विजयी झाले. त्यांनी भाजपच्या शशिकांत वाणी यांचा पराभव केला. पटेल यांना ३५३ मत मिळाली.
सोलापूरमधून भाजप पुरस्कृत उमेदवार प्रशांत परिचारक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक साळुंखे यांना पराभवाचा धक्का दिला. परिचारक यांनी १४१ मतांनी पराभव केला.
अकोल्यातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी राष्ट्रवादीच्या रवींद्र सपकाळ यांचा पराभव केला. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप यांनी शिवसेनेच्या शशीकांत गाडे यांचा पराभव केला.