राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली असून, आपला उमेदवार उतरवण्याचा हट्ट सोडला आहे. उद्धव ठाकरेंचा निर्णय हा मविआचाच निर्णय आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्धवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची उद्धवसेनेने परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसचे नेते नाराज झाले होते. तसेच या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी दिले होते.
दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवाराची निश्चिती करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची आज सकाळी गांधी भवन येथे बैठक झाली. या बैठकीत काही वेळाने उद्धवसेनेचे नेते दाखल झाले. तसेच तिथे झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धवसेनेत उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा सुटला आणि काँग्रेसने अंबादास दानवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
Web Summary : Congress withdrew its candidate from the Legislative Council election, backing Shiv Sena (UBT)'s Ambadas Danve as the MVA's consensus candidate after discussions.
Web Summary : कांग्रेस विधान परिषद चुनाव से पीछे हट गई, चर्चा के बाद शिवसेना (यूबीटी) के अंबादास दानवे को एमवीए के सर्वसम्मत उम्मीदवार के रूप में समर्थन दिया।