VIDEO - उदगीर : सैराट जोडप्याचे पोलिस ठाण्यातच शुभमंगल..
By Admin | Updated: August 5, 2016 18:24 IST2016-08-05T15:00:58+5:302016-08-05T18:24:50+5:30
प्रेमात ‘सैराट’ होवून इंदौरला धूम ठोकलेल्या येथील एका जोडप्याचे पोलिसांनी ठाण्यातच लग्न लावून दिले.

VIDEO - उदगीर : सैराट जोडप्याचे पोलिस ठाण्यातच शुभमंगल..
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ५ - प्रेमात ‘सैराट’ होवून इंदौरला धूम ठोकलेल्या येथील एका जोडप्यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी आपल्या ताब्यात घेतले होते. परंतु, अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्याच्या घेतलेल्या आणाभाका अन् त्यातून विलग होण्यास दिलेला नकार लक्षात घेता पोलिसांनी कुटूंबियांचे मनपरिवर्तन केले अन् शेवटी ठाण्यातच या जोडप्याचा ‘शुभमंगल’ सोहळा घडवून आणण्यात आला.
अमोल बच्चनसिंह पडवाळ (रा़. उज्वलनगर ता़मानोरा जि. वाशिम) हा उदगीरच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात बी़टेक़चे शिक्षण घेत आहे़ याच महाविद्यालयातील कर्मचारी प्रेमसिंग राठोड यांची व अमोलच्या वडिलांची जुनी ओळख होती़ त्यातून अमोलचे राठोड यांच्या घरी दोन वर्षांपासूनच येणे-जाणे होते़ त्यातच प्रेमसिंग राठोड यांची कन्या शारदा व अमोलची चांगली ओळख झाली़ या ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले़ याची कुणकूण दोघांच्याही घरी नव्हती़ दरम्यान, अमोलने पुढाकार घेवून पहिल्यांदा त्याच्या घरी या बाबीची माहिती दिली़ परंतु, घरच्यांनी आढेवेढे घेतले़ त्यामुळे हताश झालेल्या अमोल व शारदाने आपल्या लग्नाला परवानगी मिळणार नाही, असे गृहीत धरुन या दोघांनीही घर सोडले अन् थेट इंदौर गाठले़ इकडे मुलगी गायब झाल्याने प्रेमसिंग राठोड यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिसांत दिली़.
त्यानुसार पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी स्वत: लक्ष घालून दोनच दिवसांत त्यांचा छडा लावला़ गुरुवारी अमोल व शारदा यांना कर्मचारी एम़टी़ कोळी, एम़टी़ राठोड यांनी उदगीरला आणले़ परंतु, ठाण्यात पोलिस व कुटूंबियांसमक्ष या दोघांनी विलग न होता विवाहाचा निश्चय बोलून दाखवला़ दोघेही वयाने सज्ञान असल्याने कुटूंबियांचे मनपरिवर्तन करुन शुक्रवारी सकाळी ११ वाजता ठाण्यातच त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला़ यावेळी पोनि़राजकुमार सोनवणे, उपनिरीक्षक ए़ए़ मुलानी, कर्मचारी अजय भंडारे, आरक़े़ भोपणीकर, चंद्रकांत कलमे, नामदेव सारोळे, कोळी, राठोड यांच्यासह उपप्राचार्य डॉ़हरीदास राठोड, रिपाइं जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, शेषेराव सुडे, तंटामुक्ती अध्यक्ष विदेश पवार, उपसरपंच मारोती पवार व नागरिकांची उपस्थिती होती़