VIDEO - खामगावच्या चांदीची चकाकी पोहोचली सातासमुद्रापार
By Admin | Updated: September 20, 2016 20:42 IST2016-09-20T20:42:05+5:302016-09-20T20:42:05+5:30
एकेकाळी कापूसनगरी असलेल्या खामगावला शुध्द चांदीमुळे रजतनगरी अशी नवी ओळख मिळाली असून येथील चांदीची चकाकी सातासमुद्रापार पोहोचत आहे

VIDEO - खामगावच्या चांदीची चकाकी पोहोचली सातासमुद्रापार
गिरीश राऊत
बुलडाणा : एकेकाळी कापूसनगरी असलेल्या खामगावला शुध्द चांदीमुळे रजतनगरी अशी नवी ओळख मिळाली असून येथील चांदीची चकाकी सातासमुद्रापार पोहोचत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खामगाव शहर हे जगाच्या नकाशावर कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते.
यामुळे खामगाव शहरात रेल्वेस्टेशनची निर्मिती सुध्दा करण्यात आली. याच काळात खामगाव शहरात चांदीचा उद्योग भरभराटीस आला. १९३७ मध्ये खामगाव शहरात श्री विश्वकर्मा सिल्व्हर वर्क्सची स्थापना स्व.केसोरामजी जांगीड, स्व.गोकुलदासजी सोनी, स्व.चिरंजीलालजी जांगीड यांनी केली. व्यवहारात विश्वास संपादणूक, चांदीची शुध्दता, अप्रतिम कलाकुसर यामुळे खामगावच्या चांदीला अल्पावधीतच मागणी वाढू लागली. मात्र ग्राहक वाढले असतानाही गुणवत्तेत बदल झाला नाही. परिणामी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली.
आज अनेकांच्या घरातील दिवाणखान्यात तसेच पूजाघरात विविध वस्तुंच्या रुपात खामगाव येथील चांदीचा झगमगाट झाला आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांना भेटवस्तू देताना येथील चांदीच्या वस्तुंना मागणी होते. यामध्ये सिनेसृष्टीतील प्रथितयश अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर मुंबई येथे अर्पण करण्यासाठी मूषकराजाची निर्मिती खामगाव येथे करवून घेतली होती.
अभिनेता सुनील शेट्टी यांना भेटवस्तू स्वरुपात खामगाव येथील चांदीचा तबला देण्यात आला होता. तर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष असलेले शरद पवार यांना देण्यासाठी चांदीची बॅट, जिल्हा दौऱ्यावर असताना चांदीचा नांगर, घड्याळ अशा वस्तू येथून नेण्यात आलेल्या आहेत. गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थानातील अनेक मंदिरात येथील चांदीपासून दरवाजे, प्रभावळ, मुकूट, पूजेचे साहित्य बनविण्यात आले आहे. राज्यासोबत इतर राज्यातील मोठ्या देवस्थानांमध्ये येथील चांदीपासून निर्मित वस्तू लावण्यात आल्या आहेत. विविध देवी-देवतांच्या मूर्ती, मुखवटे, पूजेचे साहित्य, प्रभावळ, सिंहासन, छत्र यासोबतच पानदान, डिनरसेट अशा एक ना अनेक कलाकृती चांदीपासून बनविण्यात येत आहेत. राजूर येथील गणपती मंदिरासाठी प्रभावळचे निर्माण येथील विश्वकर्मा सिल्व्हर वर्क्स येथे करण्यात येत आहे. लवकरच ही प्रभावळ राजूर येथील गणपती मंदिरात झगमगणार आहे.
आजरोजी या व्यवसायात चौथी पीढी कार्यरत झाली आहे. शहर व परिसरातील अनेकजण आज विदेशात वास्तव्यास गेले आहेत. यामुळे खामगावच्या चांदीचा नावलौकिक विदेशापर्यंत पोहोचला असून मोठ्या प्रमाणात विदेशात सुध्दा खामगावच्या चांदीची मागणी असते. त्यामुळे खामगावच्या चांदीचा झगमगाट आता सातासमुद्रापार होत आहे. स्व.गोकुलदासजी सोनी यांच्यानंतर दुसऱ्या पीढीतील बन्सीलालजी सोनी व विठ्ठलदासजी सोनी त्यानंतर आता गिरधारीलालजी सोनी तर चौथ्या पिढीतील तरुण सोनी हे सुध्दा शुध्द चांदीचा व्यवसाय सांभाळत आहेत.
कलाकुसर घडविण्यात स्थानिक कलावंतच
सोने-चांदीच्या वस्तू घडविण्यात याआधी बंगाली, राजस्थानमधील सुवर्णकार काम करीत असत. मात्र आता महाराष्ट्रातील सुवर्णकार सुध्दा मागे नाहीत. स्थानिक कलावंतांकडूनही आकर्षक चांदीच्या कलाकृती बनविण्यात येत आहेत.