VIDEO : त्यांनी बांधल्या 'रोप वे'च्या सहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी...!
By Admin | Updated: July 31, 2016 21:00 IST2016-07-31T20:04:49+5:302016-07-31T21:00:26+5:30
काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या एका गिर्यारोहक तरुणाने गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या एका तरुणीशी रविवारी रोप-वेच्या सहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी बांधल्या

VIDEO : त्यांनी बांधल्या 'रोप वे'च्या सहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी...!
पावनखिंड परिसरात अनोखा विवाह : जयदीप जाधव-रेश्मा पाटील बनले जीवनसाथी
ऑनलाइन लोकमत
मलकापूर (जि.कोल्हापूर), दि. ३१ : काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या एका गिर्यारोहक तरुणाने गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या एका तरुणीशी रविवारी रोप-वेच्या सहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी बांधल्या. कोल्हापुरातील जयदीप जाधव व रेश्मा पाटील अशी त्यांची नावे आहेत. हा अनोखा विवाह सोहळा ऐतिहासिक पावनखिंड परिसरातील जाखणीच्या कड्यावरील दरीत पार पडला.
पारंपरिक विवाह पद्धतीला फाटा देऊन झालेल्या निसर्गाच्या कुशीतील या अनोख्या विवाह सोहळ्यास अनेकांंनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभेच्छा दिल्या.भाततळी (ता. शाहूवाडी) येथील जाखणीच्या कड्यावर कोल्हापुरातील जयदीप व रेश्मा यांचा हा आगळावेगळा विवाह सोहळा हिल रायडर्स ग्रुप, वेस्टर्न माऊंट, मलय अॅडव्हेंचर या ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
सैराट पध्दतीने वधु-वरांचे आगमन
दुपारी बारा वाजता वधू-वर सैराट पद्धतीने बुलेटवरून विवाहस्थळी दाखल झाले. उपस्थित पाहुण्यांनी केलेल्या ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आयोजकांनी जाखणीच्या कड्यावर सुमारे ३५0 फूट लांब व २५0 फूट उंचीवर रोप-वे बांधून वधू-वर व पुरोहितास बसण्याची व्यवस्था केली होती.विवाह सोहळ्याच्या आकर्षक पोशाखात लग्नविधीस पुरोहित सागर ढोली यांनी मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात केली.
उपस्थित अतिथींनी वधू-वरावर पुष्पवृष्टी केली. नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. दाट धुके, रिमझिम पाऊसधारा, भिरभिरणारा वारा अशा मंगलमय वातावरणात जयदीप व रेश्मा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी गेले दोन दिवस हिल रायडर्सचे प्रमुख प्रमोद पाटील, वेस्टर्न माऊंटचे विनोद कांबोज, युवराज साळुंखे, मलय अॅडव्हेंचरचे मेहबुब मुजावर, नीलेश बेर्डे, संतोष पाटील, जम्मू-काश्मीरहून या विवाह सोहळ्यास प्रशांत पाटील, रंगराव देसाई यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, महिला ग्रुपच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.
या विवाह सोहळ्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे. विवाह सोहळा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ, महिला व पर्यटकांनी गर्दी केली होती.
ऐतिहासिक पावनखिंड परिसरातील भाततळी (शाहूवाडी) येथे जाखणीच्या कड्यावर २५0 फूट उंचीवर जयदीप व रेश्मा यांनी रविवारी रोप-वेच्या सहाय्याने जन्माच्या गाठी बांधल्या.
(छाया : राजाराम कांबळे)