VIDEO: रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण, पाच जणांना अटक
By Admin | Updated: July 31, 2016 16:01 IST2016-07-31T16:01:54+5:302016-07-31T16:01:54+5:30
रुग्णाला योग्य ते उपचार दिले जात नाहीत आणि दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणावरुन रुग्णाच्या नातेवार्ईकांकडून दोन निवासी डॉक्टरांना ससून शासकीय रुग्णालयात जबर मारहाण करण्यात आली आहे.

VIDEO: रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण, पाच जणांना अटक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ : रुग्णाला योग्य ते उपचार दिले जात नाहीत आणि दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणावरुन रुग्णाच्या नातेवार्ईकांकडून दोन निवासी डॉक्टरांना ससून शासकीय रुग्णालयात जबर मारहाण करण्यात आली आहे. मागील वर्षभरात राज्यात घडलेली ही १२ वी घटना असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र सेवा अधिनियमानूसार ३५३, ३२४, ३०७, ३२३, ५०६ व १४३ या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. रमेश भिसे, राहुल परदेशी, अविनाश जाधव, रोहन साळवे व विकी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
तानाजी कोंडीबा सकट (वय ४३) यांना शुक्रवारी छातीत दुखत असल्याने ससूनमधील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये डॉ. वसुधा सरदेसाई यांच्या विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाची तब्येत खालाव चालल्याची कल्पना डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी दिली होती. मात्र शनिवारी रात्रीच्या वेळी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून न घेता रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. अभिजित जवंजाळ व डॉ. सादिक मुल्ला या कामावर असणाऱ्या निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोन्ही निवासी डॉक्टरांवर आता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. रुग्णाला यकृताचा दिर्घकालीन आजार असल्याने रुग्णाची स्थिती खालावत चालली होती. संबंधित रुग्णाचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता तर रुग्णाला दारु आणि तंबाखूचेही व्यसन होते. रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तेव्हाच त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. हीमॅटेमॅसिस आजाराच्या या रुग्णाच्या पोटातही दुखत होते असे मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर हळणोर यांनी सांगितले.
डॉ. अभिजित व डॉ. सादिक यांना खुर्ची तसेच रक्तदाब तपासणीचे मशीन, स्टेथोस्कोप, काठी इत्यादीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत डॉक्टरांचा जीव थोडक्यात वाचला आहे. अशाप्रकारे डॉक्टरांवर हल्ले होणे हे अतिशय चुकीचे असून आम्ही त्याचा निषेध करतो. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सरकारने योग्य ती पाऊले उचलली पाहीजेत अन्यथा आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडणे अवघड होईल.
डॉ. ज्ञानेश्वर हळणोर, अध्यक्ष, पुणे मार्ड
रुग्णालयात सुरक्षारक्षक असतानाही निवासी डॉक्टरांना मारहाण झाली असल्याने सुरक्षा रक्षकांवरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश शासकीय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्यानूसार कार्यवाही चालू होती. १ आॅगस्टपासून सुरक्षारक्षकांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात ४८ सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेले असून आणखी ४४ कॅमेरांची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून शासकीय रुग्णालय
माझ्या पतीचा मृत्यू हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्याबरोबरच आमच्यासोबत असणाऱ्यांना निवासी डॉक्टर व सुरक्षा रक्षकांकडून जबर मारहाण करण्यात आलेली असून जोपर्यंत संबंधितांवर गुन्ह्यांची नोंद करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.
संगीता सकट, रुग्णाची पत्नी