VIDEO: - पोतराजांच्या गावात 'पोतराज' आणावे लागतात बाहेरून !
By Admin | Updated: July 31, 2016 13:45 IST2016-07-31T13:40:02+5:302016-07-31T13:45:06+5:30
पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले.

VIDEO: - पोतराजांच्या गावात 'पोतराज' आणावे लागतात बाहेरून !
प्रताप नलावडे
बीड, दि. ३१ - पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. गावातील लोकांचे सामाजिक संस्थांनी केलेले प्रबोधन आणि नव्या पिढीने रूढीच्या बंधनातून स्वत:ची जाणीवपूर्वक केलेल्या सुटकेमुळे आता गावात पोतराज राहिलेलेच नाहीत.
अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा गावापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर केरूळ हे अगदी छोटेखानी गाव आहे. गाव शंभर उंबऱ्याच. अगदी वीस वर्षापूर्वी गावातील प्रत्येक घरातून एक पोतराज म्हणून देवीची भक्ती करायचा. अंगाभोवती रंगीबेरंगी चिंध्या गुंडाळून कपाळावर कुंकवाचा भला मोठा मळवट आणि वाढलेल्या जटांचा हा पोतराज स्वत:ला यातना देत देवीची भक्ती करतो. उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारून केली जाणारी ही देवीची सेवा अंधश्रध्देतून आलेली. परंतु एक मोठा समाजाच यात अडकलेला.
केरूळा या गावातही अशाच अंधश्रध्देतून प्रत्येक घरातून एक पोतराज झालाच पाहिजे, असा वर्षा न् वर्षाचा दंडक. परंतु गावात अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. याशिवाय सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने गावातील लोकांनी आणि विशेषत: तरूणांनी स्थलांतर केले आणि पोतराज प्रथेपासून गाव मुक्त झाले. तरीही श्रध्देचा भाग म्हणून गावात आषाढ महिन्यात मरीआईची पूजा मांडलीच जाते. यासाठी मग गावात पोतराज नसल्याने आजुबाजुच्या गावातून पोतराजांना पाचारण केले जाते.
यावेळीही असेच घडले. मरीआईच्या पूजेसाठी नगर आणि इतर ठिकाणाहून पोतराजांना गावात आणले गेले. परंतु एकेकाळी पोतराजांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची ही ओळख तरी आता पुसली गेली असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना हायसे वाटते.