व्हीडीओ - चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

By Admin | Updated: August 5, 2016 21:05 IST2016-08-05T21:05:42+5:302016-08-05T21:05:42+5:30

चांदोली धरण परिसरातील सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या चार वक्राकार दरवाजे शुक्रवारी सायंकाळी उघडण्यात आले

VIDEO - Open the doors of the Chandoli Dam | व्हीडीओ - चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

व्हीडीओ - चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

ऑनलाइन लोकमत
वारणावती : चांदोली धरण परिसरातील सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या चार वक्राकार दरवाजे शुक्रवारी सायंकाळी उघडण्यात आले. चारही दरवाजे 0.७५ मीटरने खुले करून त्यातून ९ हजार ८00 क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला आहे. शिवाय जलविद्युत केंद्र्राकडून १२00 क्युसेक असा एकूण ११ हजार क्युसेकचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.
गेल्या ३६ तासात या परिसरात १३५ मिलिमीटर पावसासह एकूण १८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी याचदिवशी १३१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. धरणात सध्या ३२.२६ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची पाणी पातळी ६२५.२0 मीटर आहे. ९३.७७ टक्के धरण भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रात्री धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे.

चांदोली धरण राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण असून १९७६ मध्ये बांधण्यात आलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४0 टीएमसी आहे. याच धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिर्ती करून सिंचनासाठी पाण्याचा वापर करण्याच्या उद्देशाने विद्युतनिर्मिती करणारी आठ मेगावॅटची दोन जनित्रे १९९८ व १९९९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. या दोन युनिटमधून आजअखेर ८६१.४१२७ दशलक्ष युनिटची वीज निर्मिती झाली आहे, तर डाव्या व उजव्या कालव्यातून आराखड्यानुसार ८६ हजार ७00 हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात कधी संततधार, तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरण परिसरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर असते. परंतु यंदा १ जूनपासून आजअखेर फक्त १८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे, तर वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा ते शित्तूर व चरण ते सोंडोली या दोन्ही पुलांच्या कठड्यांना पाणी लागले असून हे दोन्ही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असून शिराळा व शाहुवाडी या दोन तालुक्यातील संपर्क बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: VIDEO - Open the doors of the Chandoli Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.