VIDEO : पहिल्या श्रावणी सोमवारी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By Admin | Updated: August 8, 2016 12:53 IST2016-08-08T11:16:22+5:302016-08-08T12:53:22+5:30
हर हर महादेवचा जयघोष करत परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले

VIDEO : पहिल्या श्रावणी सोमवारी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ८ - हर हर महादेवचा जयघोष करत परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येत असतात.
वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, पुरूष आणि पासधारकांसाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या असून यामुळे दर्शन व्यवस्थेत गोंधळ होत नसल्याचे ट्रस्टचे राजेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दर्शनासाठी आलेले भाविक बेल फूल पिंडीवर वाहून जयघोष करत असून दर्शनासाठीची रांग मंदिराच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचली आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक वैजनाथ मंदिर
परळी येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. बीडपासून परळी वैद्यनाथ हे अंतर ९० किलोमीटर अंतरावर आहे.