Cyber Crime News: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआयद्वारे तयार केलेला चेहरा व्हिडीओ कॉलमध्ये वापरून एका माजी अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून सुमारे ७८ लाख ६० हजार रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. एआय तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका माजी अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी विश्वास नांगरे पाटील यांचा एआयद्वारे तयार केलेला फोटो लावून व्हिडीओ कॉल केला. तसेच तुमच्या पत्नीच्या बँक खात्यामधून संशयास्पद व्यवहार झालेल आहेत, त्याचा संबंध अब्दुल सलाम नावाच्या दहशतवाद्याशी असून, त्यामाध्यमातून तुमच्या खात्यात २० लाख रुपये आले आहेत, अशी बतावणी केली. तसेच या प्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची बतावणी केली. त्यानंतर या निवृत्त अधिकाऱ्याला अटकेची धमकी देऊन डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ७८ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम उकळली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तसेच अशा प्रकारचे बनावट फोन आल्यास त्याला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.