VIDEO: बुलडाणा - मेंढपाळांची मुले घेत आहेत काँन्व्हेंटमध्ये शिक्षण
By Admin | Updated: July 9, 2016 19:23 IST2016-07-09T19:17:56+5:302016-07-09T19:23:16+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची मुले आता काँन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायला लागली आहेत
VIDEO: बुलडाणा - मेंढपाळांची मुले घेत आहेत काँन्व्हेंटमध्ये शिक्षण
विवेक चांदूरकर / ऑनलाइन लोकमत -
एका ठिकाणी चार महिन्यांचेच वास्तव्य
बुलडाणा, दि. 09 - अंगावर काँन्व्हेंटचा गणवेश, पाठीवर दफ्तर अन हातात वॉटरबॅग घेवून शाळेत जाणारे विद्यार्थी सर्वत्रच दिसतात. मात्र, हे चित्र जेव्हा जंगलात राहुट्या टाकून वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ्यांच्या वस्तीत दिसते तेव्हा मन थक्क होते. पिढ्यांपिढ्यांपासून देशभर रानोमाळ हिंडून मेंढ्या चारून आपली उपजिवीका भागविणा-या मेंढपाळ्यांच्या जीवनातही आता शिक्षणाचा किरण उगवला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सध्या वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची मुले आता काँन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायला लागली आहेत. शिक्षणातून विकास साधता येतो, याचे महत्व कळल्यामुळेच निरक्षर असलेल्या आई वडिलांनी मुलांना काँन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला आहे.
बुलडाणा ते खामगाव मार्गावर ज्ञानगंगा अभयारण्यात परराज्यातील मेंढपाळ वास्तव्यास आले आहेत. चार महिने येथे त्यांचे वास्तव्य असणार आहे. पहाडाच्या पायथ्याशी छोट्या छोट्या झोपड्या टाकून मेंढपाळ वास्तव्यास आहेत. त्यांच्या तांड्यातील कुणालाही साधी अक्षर ओळखही नाही. मात्र जे आपल्या वाट्याला आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये यामुळे मुलांना शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या मुलांना जवळच असलेल्या रोहणा येथील सर्वज्ञ ज्ञानपीठ या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. मुलांना दररोज शाळेत घेवून जाण्याकरिता वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या वस्तीतील आकाश ठोंबरे, सुशील ठोंबरे, वैशाली पिसाळ, संतोष पिसाळ ही मुले चवथ्या वर्गात शिक्षण घेत असून, त्यांच्यासोबत १३ मुले दररोज शाळेत ये - जा करतात.
अंगावर काँन्व्हेंटचा गणवेश, पाठीवर दफ्तर अन हातात वॉटरबॅग घेवून ही मुले सकाळी निघतात. शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च, त्यांची पुस्तके पालक करतात. मुलेही दररोज नित्यनेमाने शाळेत जातात. मेंढ्यांच्या सहवासात रात्रीच्या अंधारात जंगलात राहणा-या या मुलांच्या चेह-यावर शाळेत जाण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. येथे विद्युत पुरवठा नसल्यामुळे रात्री अंधार असतो. दररोज सकाळी उठून मुले अभ्यास करतात. त्यानंतर शाळेत जातात. शिक्षणापासून कोसो दूर असलेले मेंढपाळ मुख्य प्रवाहापासून दूरच आहेत. केवळ मेंढ्यांसाठी अन्नाचा शोध घेणे, त्यांना विकून, त्यांच्या शरीरावरील केसं विकून ते उपजिवीका भागवितात. शिक्षणाचा गंधही त्यांना कधी शिवत नाहीत. मुलांचा जन्मही जंगलातील कुठल्यातरी झोपडीत होतो अन मृत्यूही अशाच अनोळखी ठिकाणी. अनेक पिढ्या अशिक्षित व निरक्षर असल्यामुळे त्यांची फसवणूक अनेकदा होते. शिक्षणामुळे मात्र या मुलांच्या जीवनात नवी क्रांती घडणार आहे.
ठिकाणानुसार बदलते शाळा!
मेंढपाळांचा मुक्काम बुलडाणा जिल्ह्यात चार महिन्यांसाठीच असणार आहे. त्यानंतर ते मुक्काम हलविणार असून, ज्या ठिकाणी जातील तेथील शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्यात येणार आहे. वर्षभर अशाचप्रकारे मुलांना विविध शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागते.
परंपरागत व्यवसाय संपण्याच्या भीतीनेच अवलंबिला शिक्षणाचा मार्ग मेंढपाळांचा मुळ व परंपरागत व्यवसाय हा मेंढ्यांची विक्री व त्यांच्या केंसांची विक्री हा आहे. आधूनिक काळात आता हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आगामी काळात मुलांना शिक्षण देवून नोकरीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्याही मुलांनी मुख्य प्रवाहात येवून नोकरी करावी याकरिता मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.