विदर्भाचे वेगळे राज्य होणारच!

By Admin | Updated: July 31, 2016 05:06 IST2016-07-31T05:06:07+5:302016-07-31T05:06:07+5:30

वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठिंबा आहे़ आमचा मित्रपक्ष शिवसेनेचा याला विरोध असला, तरी त्यांची आमची युती निवडणुकीपुरती आहे़

Vidarbha will be separate state! | विदर्भाचे वेगळे राज्य होणारच!

विदर्भाचे वेगळे राज्य होणारच!


शिर्डी : ‘वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठिंबा आहे़ आमचा मित्रपक्ष शिवसेनेचा याला विरोध असला, तरी त्यांची आमची युती निवडणुकीपुरती आहे़ त्यामुळे योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्राचे विभाजन होईलच,’ असे शनिवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत ठणकावून सांगितले़
‘भाजपाची प्रशासनाच्या दृष्टीने लहान राज्ये करण्याची भूमिका आहे़ आम्ही ज्या राज्यांचे विभाजन केले, तेथे पेढे वाटण्यात आले व काँग्रेसने आंध्रचे विभाजन केले, तेथे दंगली झाल्या,’ याचे स्मरण करून देत, ‘केवळ राजकारणासाठी विभाजन करण्याला आमचा विरोध आहे,’ असा टोला दानवे यांनी काँग्रेसला लगावला़ नाशिक महानगर जिल्हा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला शनिवारी खा़ दानवे यांनी हजेरी लावली़
>७०० ठिकाणी प्रशिक्षण
राज्यात ७०० ठिकाणी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे़ त्या माध्यमातून या महिनाअखेर एक लाख कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील़ याचा फायदा आगामी स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिका आदींना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
>विश्वस्त मंडळावर कार्यक्षम प्रतिनिधी
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर कार्यक्षम व प्रशासनाचा उत्तम अनुभव असणाऱ्यांचीच नेमणूक केल्याचा दावा दानवे यांनी केला़ शिवसेनेला उपाध्यक्ष पद न मिळाल्यास विश्वस्त मंडळातून बाहेर पडणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, आमचा महामंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत करार झालेला आहे़ त्यात त्यांना काही शंका असतील, तर पुन्हा चर्चा करता येईल, असे दानवे म्हणाले़
>नेत्यांचे मोबाईल होणार आज ‘जॅम’
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रविवारी ‘मोबाईल हँग’ आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत वेगळ्या विदर्भाची पूर्तता कधी होणार या आशयाचे ‘एसएमएस’ भाजपा नेते व लोकप्रतिनिधींना पाठविणार आहेत.

Web Title: Vidarbha will be separate state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.