निवडणुकीपूर्वीच विदर्भ राज्याचा निर्धार
By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T01:18:03+5:302014-07-27T01:18:03+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये

निवडणुकीपूर्वीच विदर्भ राज्याचा निर्धार
विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतिदिनी ‘बस देखो, रेल देखो’ आंदोलन
वर्धा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांचा काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही, तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे. तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची हीच संधी आता हातून जावू द्यायची नाही, असा निर्धार शनिवारी येथे विदर्भवाद्यांनी केला.
वेगळ्या विदर्भासाठी जनमंच आणि आम्ही वर्धेकर समितीच्यावतीने स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वेगळ्या विदर्भाची’ शपथ घेतली. तसेच येत्या ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून विदर्भात ‘बस देखो, रेल देखो’च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाश्याला ‘विदर्भ बंधनाचा’ धागा बांधण्यात येणार आहे. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयींचे सरकार इतर राजकीय पक्षांच्या कुबड्यांवर चालत होते. शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवनेश्वर येथे भाजपने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला. आता केंद्रात भाजपचे सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही, मात्र सत्ता येताच भाजपचा सूर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल. सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे. मग पुढील निवडणूक त्या आधारे जिंकायची, हा राजकीय डाव आहे. तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची हीच सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शक्य आहे, याकडे जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील व मान्यवरांनी लक्ष वेधले. जावंधिया यांनी या लढ्यात प्रत्येकाने स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले. मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्य कारभार करीत आहे, असेच सुरू राहिले तर केवळ दोन वर्षांत कापूस शेतकऱ्यांना खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही. समाजातील इतर घटकांनाही याची झळ पोहचले. शेतकऱ्यांना या संकटातून काढण्यासाठी विदर्भाचा लढा प्रत्येकाने लढण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचालन नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे, तर आभार कवी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)