विदर्भात वस्त्रोद्योगाला चालना देणार
By Admin | Updated: January 18, 2015 00:56 IST2015-01-18T00:56:48+5:302015-01-18T00:56:48+5:30
विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस पिकत असतानाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या भागात वस्त्रोद्योगाला चालना देण्याची

विदर्भात वस्त्रोद्योगाला चालना देणार
वस्त्रोद्योग परिषदेत गडकरींची ग्वाही : संशोधनावर भर देण्याचे आवाहन
नागपूर : विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस पिकत असतानाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या भागात वस्त्रोद्योगाला चालना देण्याची गरज असून यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
टेक्सटाईल्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या विदर्भ शाखेतर्फे येथील देशपांडे सभागृहात आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय आणि ७० व्या अ.भा. टेक्सटाईल्स कॉन्फरन्सच्या उद््घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून नितीन गडकरी बोलत होते.
व्यासपीठावर माजी खा. दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी यांच्यासह टेक्सटाईल्स असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद सिन्हा, उपाध्यक्ष के.डी. सिंघवी, माजी अध्यक्ष डी.आर. मेहता, सी.डी. मायी, कॉन्फरन्सचे अध्यक्ष हेमंत सोनारे, हरीश पारेख, व्ही.डी. झोपे, आर.के. दुबे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न या भागातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. त्यातून रोजगार निर्मितीची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने ते पूर्ण झाले नाही. यासाठी या भागातील राजकीय नेतृत्वाचेही अपयश कारणीभूत आहे. या भागात वस्रोद्योगाला चालना द्यायची असेल तर पारंपरिक उपाययोजनांना तिलांजली देऊन नवीन संशोधनावर भर द्यावा लागेल. त्यादृष्टीने टेक्सटाईल असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.
उद्योगक्षेत्राला चालना देतानाच उद्योगाविषयी मानसिकता बदलावर गडकरी यांनी भर दिला. उद्योग सुरू होण्याऐवजी तो बंद कसा पडेल असेच प्रयत्न अलीकडच्या काळात केले जाते. कधी सरकारी अधिकारी अडथळे आणतात तर कधी त्यासाठी स्थानिक कारणे असतात. उद्योग सुरळीत चालला पाहिजे अशी मानसिकता निर्माण व्हवी. गुंतवणूक वाढली तर रोजगार वाढेल व रोजगार वाढला तर दरडोई उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुखी होईल. यासाठी प्रत्येक गावात कापसापासून सूत काढण्याचे तंत्रज्ञान विकसित व्हावे, उद्योगाकडून सूत खरेदीची व्यवस्था व्हावी, या दृष्टीनेही प्रयत्न होण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.
प्रास्ताविक हेमंत सोनारे यांनी केले. या परिषदेचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. यावेळी अरविंद सिन्हा, डी.आर. मेहता यांची भाषणे झाली. दोन दिवस ही परिषद चालणार आहे. (प्रतिनिधी)
नांदेडजवळ वॉटर पोर्ट
नांदेडजवळ वॉटर पोर्ट तयार करून तेथून विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस दक्षिणेत पाठविण्याची सोय उपलब्ध करून देऊ. यामुळे कापूस वाहतुकीचा खर्च कमी होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
यांचा झाला सत्कार
टेक्सटाईल असोसिएशनतर्फे कार्यक्रमात शेतकऱ्यांपासून तर उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात वसंत भोंगाडे (सिंदी-जि. वर्धा) अरेंद्रम बासू, हरीश पारेख, ए.व्ही. मंत्री, आर.आर. अग्रवाल यांचा समावेश होता. असोसिएशनच्या दिल्ली शाखेला ‘बेस्ट युनिट’ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.