भाज्या स्वस्त होणार!

By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:37:43+5:302014-08-18T00:37:43+5:30

सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत

Vegetables will be cheaper! | भाज्या स्वस्त होणार!

भाज्या स्वस्त होणार!

स्थानिकांची आवक वाढली : टमाटर, मिरचीच्या किमतीत घट
नागपूर : सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रविवारी भाज्या स्वस्तात उपलब्ध झाल्याने गृहिणींमध्ये उत्साह आहे. महागाईत थोडीफार का होईना, गृहिणींच्या बचतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांआधी प्रति किलो १०० रुपयांवर गेलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव सध्या अर्ध्यांपेक्षा कमी आहेत. टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, भेंडी, पालक, कोहळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. स्थानिक उत्पादकांसह बाहेरून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.
भाज्यांची मुबलक आवक
गेल्यावर्षी याच काळात जास्त पावसामुळे भाज्या खराब झाल्याने महागल्या होत्या. सणांमध्ये किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दर ५० ते ७० रुपये किलो होते. या कारणाने सण साजरे करणारे नको ही महागाई असेच म्हणत होते. पण यंदा स्थिती वेगळी आहे. यावेळी पाऊस पडला, पण उघाडही दिल्याने भाज्यांच्या पिकाला फटका बसला नाही, शिवाय कीडही पडली नाही. भाज्या मुबलक प्रमाणात बाजारात येण्याचे हे मुख्य कारण आहे. उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च पाहता बाहेरून येणारा माल तसा महागच असतो. किरकोळमध्ये काही भाज्या वगळता बहुतांश स्वस्त आहेत.
कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मदनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नागपूरलगतहून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारल्याची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत.
कांदे उतरले, बटाटे महागच
सध्या कांद्याला मागणी कमी असल्याने भाव आटोक्यात आहेत, तर भाज्यांच्या किमतीमुळे बटाट्याला मागणी वाढली आहे. कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २५ रुपयांवर आहे. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याची आवक वाढली आहे. पांढरे आणि लाल कांदे ७०० ते ७२५ रुपये मण (४० किलो) आहेत. अमरावती आणि अकोला येथून पांढरा तर बुलडाणा येथून लाल कांद्याची आवक आहे. थोडेफार ट्रक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून येत आहेत.
श्रावणात कांद्याची विक्री कमी असल्याने दरही कमी असतात. तीन आठवड्याआधी भाव १००० रुपयांवर होते. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर कमी होण्याचे शक्यता असल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Vegetables will be cheaper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.