मार्केट बंदमुळे भाजीपाला कडाडला
By Admin | Updated: June 5, 2014 22:49 IST2014-06-05T21:53:42+5:302014-06-05T22:49:24+5:30
बेमुदत बंद पुकारल्याने भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात दुप्पट ते तिप्पटीने वाढ झाली आहे.

मार्केट बंदमुळे भाजीपाला कडाडला
आडते असोसिएशनचा बंद सुरुच, पुणेकरांवर भाजी संकट
पुणे : टोळी प्रश्नावरुन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बेमुदत बंद पुकारल्याने भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी किरकोळ बाजारातील सर्वच पालेभाज्या व फळभाज्यांच्या भावात दुप्पट ते तिप्पटीने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात अगदी १५ ते २० रुपयादरम्यान मिळणार्या बटाट्याचे भाव चाळीस रुपयांवर, तर वीस रुपयांवर मिळणारी सिमला मिरची ८० रुपये किलोवर पोचली आहे. घेवड्याचा प्रतिकिलोचा भाव तर १२० रुपयांवर गेला आहे. पालेभाज्यांच्या एका जुडीचा भावही २० रुपयांच्या पुढेच आहे.
टोळी पद्धत रद्द करावी या मागणीसाठी आडते असोसिएशनने बुधवारपासुन बेमुदत बाजारपेठ बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यापुर्वी एक जुन पासून कांदा-बटाटा विभाग बंद होता. त्याचा एकत्रित परिणाम आता किरकोळ बाजारात दिसून येत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व मांजरी बाजारात सकाळी सहा ते दहा या वेळेत विक्री व्यवस्था सुरु केली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात शेतकर्यांनी २ हजार क्विंटल भाजीपाला आणला, असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. मात्र मागणीच्या तुलनेत आवक अगदीच किरकोळ आहे.
या बाबत माहिती देताना किरकोळ भाजी विक्रेते सचिन काळे म्हणाले, पुणे बाजारात अगदी किरकोळ आवक होत आहे. त्यामुळे तेथेच चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री होत आहे. परिणामी किरकोळ विक्रेते शेतकरी अथवा मांजरी बाजारातून भाजी विकत घेत आहेत. परिणामी भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे प्रतिकिलो भाव (कंसात गेल्या आठवड्यातील भाव) : कांदा २८-३० (१५-१६), बटाटा ३०-३५ (२०-२२), कोबी ३५ (१४-१५), फ्लॉवर ५५ (२५), हिरवी मिरची ४० (२०-२२), काकडी ४५ (२२), सिमला मिरची ८० (२२), घेवडा १२० (३५-५०).
पालेभाज्यांचे एका जुडीचे भाव : मेथी २५ (१०), कोथिंबीर २५ (१०), पालक २० (७-८), मुळा २५-३० (१२-१४).