वैदिक हे देशद्रोहीच - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: July 16, 2014 14:24 IST2014-07-16T10:22:43+5:302014-07-16T14:24:32+5:30
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला भेटणरे वेदप्रकाश वैदिक हे देशद्रोहीच आहेत असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे.

वैदिक हे देशद्रोहीच - उद्धव ठाकरे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला भेटणरे वेदप्रकाश वैदिक हे देशद्रोहीच आहेत अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वैदिक - सईद भेटीवर टीका केली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
भाजप समर्थक आणि योगगुरु बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. या दौ-यात वैदिक यांनी दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेतली होती. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केली असतानाच बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून या भेटीवर जोरदार टीका केली आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या म्होरक्याला भेटणा-यांना चटके द्यायला पाहिजे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
मंगळवारी केंद्र सरकारने लोकसभेत या भेटीशी सरकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणतात, भारतीय नागरिकांना तुरुंगात डांबून ठार मारणारे पाकिस्तान वैदिक यांच्याशी ऐवढ्या सौजन्याने का वागले. या सर्व प्रकरणाचा गुप्तचर यंत्रणांनी शोध घ्यायला हवा. केंद्र सरकारनेही या प्रकरणावरुन हात न झटकता प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधिंतांवर कारवाई करावी. केंद्र सरकारने कारवाई केली नाही तर उद्या कोणीही जाऊन दाऊद, टायगर मेमन यांच्यासोबत बिर्याणी खाऊन येईल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.