वसई ग्रामीण आजही उपेक्षितच
By Admin | Updated: August 15, 2016 04:04 IST2016-08-15T04:04:56+5:302016-08-15T04:04:56+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

वसई ग्रामीण आजही उपेक्षितच
सुनील घरत,
पारोळ/वसई- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रस्ते तसेच शासनाकडून येणाऱ्या योजना निव्वळ कागदावरच आहेत की काय, अशी परिस्थिती आहे. सरकारी बाबू आणि राजकीय नेत्यांच्या बनवेगिरीमुळेचे ही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.
वसई महानगरपालिकेचा पूर्व भाग हा डोंगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासींची वस्ती आहे. हातावर पोट ही या भागाची जीवन पद्धती. पण या भागाकडे राजकीय नेत्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विकास फक्त कागदावरच दिसत आहे.
पालघर जिल्ह्यात शासन जि.प. शाळा डिजिटल करत असताना तिल्हेर परिसरातील शाळकरी मुलांना गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. गरीब मुलांनी फक्त गळक्या शाळेत शिक्षण घ्यावे का? हा प्रश्न या भागातील पालकांसमोर आहे.
या भागातील आरोग्य यंत्रणाही आजारी आहे. पारोळ, मांडवी, भाताणे या भागांत आरोग्य केंदे्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांना गळती लागल्याने गरीब रुग्णांना छत्री घेऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. पारोळ आरोग्य केंद्र तर भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. शासनाला चुना लावल्याचा आरोप या केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यावर आहे. या भागातील रस्ते वाहून गेल्याचे भाताणे, उसगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. जर गावांचा सातत्याने संपर्क तुटत असेल तर प्रशासन करते काय, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
>दुर्लक्षित धोरणाचे दुष्परिणाम
या भागातील गरीब विद्यार्थ्यांवर रस्त्याअभावी शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तानसा नदीवरील उसगाव, भेठे या पुलांची उंची कमी असल्यामुळे हे पूल पाण्याखाली जात असल्यामुळे अनेक वर्षांपासून आठआठ दिवस या गावांचा संपर्क तुटत आहे.
या भागातील सुरक्षा यंत्रणेची ही बोंब आहे. पारोळ भागातील दुकानफोड्या, घरफोड्या करणाऱ्यांचा अजूनही तपास नाही. घराबाहेर या ठिकाणी पाणी पिण्याच्या विहिरीत विष टाकले. या गंभीर बाबीचाही तपास नाही. महसूल अधिकारीही शेतकऱ्यांपेक्षा जमीन दलालाच्या कामात मग्न, महिन्याला येणाऱ्या रेशनिंगचा पत्ता नाही अशा अनेक समस्या या भागात पाहायला मिळतात.
सरकारे बदलली, लोकप्रतिनिधी बदलले, ग्रामपंचायत असलेल्या वसई-विरारची महानगरपालिका झाली, तरी पण वसई पूर्व भागाची अवस्था आजही बिकट आहे.