अतुल कुलकर्णीसंपादक, मुंबई
काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले की इकडे महाराष्ट्रात पतंगबाजी सुरू होत असे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना झापले, अशा बातम्या सुरू व्हायच्या. ‘आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू होते. काही दिवसांतच नवा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू होतात. हे आम्हाला नवे नाही’, अशी मिश्कील टिप्पणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख करायचे. काँग्रेस संकेतावर राजकारण करायची. दिल्लीत सोनिया गांधींना भेटून बाहेर येताच भेटीची माहिती मुख्यमंत्र्यांनी मीडियाला दिली तर त्यांचे पद शाबूत असल्याचा अर्थ निघायचा. मुख्यमंत्री मागच्या दाराने मीडियाला टाळून दिल्ली सोडून गेले की, त्यांचे काही खरे नाही अशा बातम्या सुरू व्हायच्या. त्यातही पक्षश्रेष्ठींनी झापल्यानंतरची ‘बॉडी लँग्वेज’ आणि सगळे काही आलबेल आहे असे कळाल्यानंतरची ‘बॉडी लँग्वेज’ याचे अर्थ ‘बॉडी लँग्वेज’च्या काही थोर ‘अभ्यासू’ पत्रकारांना लगेच कळायचे. तर काहींची नेत्यांच्या ‘फेस रीडिंग’वर पीएच.डी. झाली असावी इतके ते चेहरा बघून नेत्याच्या मनातले सांगू लागतात. आता ‘बॉडी लँग्वेज’चा अभ्यास करणारे काही पत्रकार ‘देहबोली शास्त्रज्ञ’ झाले आहेत. देहबोलीवरूनच कोणाचा बँड वाजला, कोणाचे शुभमंगल झाले हे सांगण्यात ते तज्ज्ञ झाल्याचे सांगितले जाते. मात्र, खरे कारण वेगळेच असते. ते पुढे वाचत जाल तर स्पष्ट होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शाह यांची भेट घेतली. शाह-शिंदे भेटीच्या बातम्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर आल्या. दोघांमध्ये झालेल्या भेटीची माहिती बाहेर कशी येते? जी येते ती किती खरी? किती खोटी? हे ते दोघेच सांगू शकतील. दोन्ही नेते स्वतःहून तर ही माहिती बाहेर सांगणार नाहीत. एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्यानंतर काहीही घडले तरी माध्यमांना बिनधास्तपणे भेटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. लढणारे नेते अशी ते स्वतःची व्याख्या करतात. मात्र, अनेकदा त्यांचा चेहरा खूप काही सांगत असतो असे ‘फेस रीडिंग’ करणाऱ्यांना वाटते. याही वेळी तसेच झाले.
या पतंगबाजीत -अमित शाह यांनी शिंदे यांना सांगितले की तुम्ही तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा. यापुढे महाराष्ट्रात तुमच्या पक्षाला अडचणीची परिस्थिती भाजपकडून निर्माण केली जाणार नाही. तसे निर्देश मी भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला देईन...असा शब्द शाह यांनी दिला आहे... असे काही पतंग शिंदेंच्या गोटातून उडाले. तर तुम्हाला जसा तुमचा पक्ष वाढवायचा आहे, तसे भाजपला स्वतःची वाढ करायची आहे...रवींद्र चव्हाण जे ठरवतील ते पक्षाच्या हिताचे ठरवतील... शिंदे काहीही म्हणाले तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम चालू ठेवा, असे शहा यांनी फडणवीस यांना सांगितले... असे काही पतंग भाजपच्या गोटातून उडाले.
एक पतंगबाजी अशीही करण्यात आली की, शिंदे जेव्हा शाह यांना भेटून बाहेर आले, तेव्हा ते नाराज दिसले. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते तसेच निघून गेले. एरवी प्रत्येक वेळी ते पत्रकारांशी बोलतात. याचा अर्थ, त्यांना फारसे काही हासिल झाले नसावे अशीही चर्चा आहे...वास्तविक दिल्लीत शाह यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. बिहारमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयासाठी अभिनंदन करण्याकरिता आपण आलो होतो, असे शिंदे म्हणाले. मात्र त्यात मसाला नसल्यामुळे ते कारण अनेकांना तकलादू वाटले. खरे तर काही गोष्टी ‘लॉजिक’ लावून बघितल्या पाहिजेत. शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीची निवडलेली वेळ चर्चेचे खरे कारण ठरली. बिहार निकालानंतर लगेचच त्यांनी शाह यांची भेट घेतली असती तर एवढी चर्चा झाली नसती. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे शाह यांच्या भेटीला गेले. त्यामुळेच ही पतंगबाजी झाली.
भेटीची निवडलेली वेळ, बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मी रडणारा नेता नाही, तर मी लढणारा नेता आहे, असे वारंवार एकनाथ शिंदे यांनी सांगण्यावरूनच चर्चा सुरू झाली असे नाही. मंत्रिमंडळ बैठकीवर कुठलाही बहिष्कार टाकलेला नाही, असे एकनाथ शिंदे सांगत असताना त्यांचेच काही मंत्री मंत्रालयात त्यांच्या त्यांच्या दालनात, माध्यमांना बहिष्काराची कारणे सांगत होते. शिंदे यांचे सहकारी मंत्री बहिष्काराची कारणे सांगत असतील तर शिंदेंचे खरे मानायचे की त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे? एकनाथ शिंदे जे सांगतात त्याच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षाचे नेते माध्यमांना नाराजीची माहिती कारणांसह सांगतात. आमचे नाव कुठे येऊ देऊ नका, असेही सांगतात. अशा वेळी पतंगबाजी होणार नाही तर काय होईल?
हे सगळे एकीकडे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांचे ठाण्यात किंवा अन्यत्र ज्या पद्धतीचे वागणे-बोलणे आहे ते दुसरीकडे. या सगळ्या गोष्टी पतंगबाजीला बळ देतात. एकनाथ शिंदे यांना शंभर जागा जिंकून भेट द्यायची आहे. त्यात ९० जागा शिंदेसेनेच्या असतील, असे विधान ठाण्याचे खासदार नरेश मस्के करतात. मुंबईत शिंदेसेनेला अनेक वॉर्डांमध्ये गटप्रमुख देखील मिळत नाहीत, असेही काही नेते सांगतात, तर ठाण्यातील एका वार्डातील भाजप-शिंदेसेनेतील दुश्मनी सगळ्या महायुतीत आहे, असे चित्र काही जण रंगवतात. उद्धव-राज यांच्या पक्षात दोघांमधला वाद दिसत नसला तरी एकोपा दाखवण्याची एकही संधी ते दोघे सोडत नाहीत. त्याचवेळी भाजप-शिंदेसेना आपसातले वाद जनतेसमोर मांडण्याची एकही संधी गमावत नाहीत. पतंगबाजी जोरात सुरू राहो... अनेकांना ‘फेस रीडिंग’ आणि ‘बॉडी लँग्वेज’मध्ये नोबेल मिळो, ही एवढीच सदिच्छा सामान्य मतदार देऊ शकतात. गटर, वॉटर, मीटर हे प्रश्न या निवडणुकीचे नाहीत. जात, धर्म, तू मोठा की मी मोठा... हे प्रश्न सुटले की बाकी प्रश्नांचा विचार करता येईल..!
Web Summary : Speculation swirls post Amit Shah-Eknath Shinde meeting. Whispers from both camps fuel rumors of discord and power plays within the Maharashtra coalition government.
Web Summary : अमित शाह-एकनाथ शिंदे की मुलाकात के बाद अटकलें तेज। दोनों खेमों से महाराष्ट्र गठबंधन सरकार के भीतर मतभेद और सत्ता संघर्ष की अफवाहें उड़ रही हैं।