वनिताचा सांगाडा बाहेर काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 01:17 IST2016-08-20T01:17:50+5:302016-08-20T01:17:50+5:30
वाई हत्याकांडातील वनिता गायकवाड यांच्या मृतदेहाचा सांगाडा संतोष पोळच्या धोम येथील घरासमोर खड्डा खणून पोलिसांनी शुक्रवारी बाहेर काढला. यामुळे पोळच्या कबुलीप्रमाणे त्याने

वनिताचा सांगाडा बाहेर काढला
वाई हत्याकांड : संतोष पोळच्या धोम येथील घरासमोर खड्डा काढून अवशेष काढले
सातारा : वाई हत्याकांडातील वनिता गायकवाड यांच्या मृतदेहाचा सांगाडा संतोष पोळच्या धोम येथील घरासमोर खड्डा खणून पोलिसांनी शुक्रवारी बाहेर काढला. यामुळे पोळच्या कबुलीप्रमाणे त्याने खून केलेल्या सहाही व्यक्तींच्या मृतदेहांचे सापळे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
२००६ मध्ये वनिताचा खून केल्याचे सिरीयल किलर पोळने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे त्याला उंब्रज व मसूरला नेण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री साताऱ्यात परत आल्यानंतर त्याने वनिताचा मृतदेह कुठे गाडून ठेवला, याबाबत अखेर तोंड उघडले. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोळला घेऊन पोलिसांचा फौजफाटा धोम येथील घराजवळ पोहोचला. अंगणातील अंजिराच्या झाडाखाली खोदकाम करून सुमारे तीन तासांनी हाडांचा सापळा काढण्यात पोलिसांना यश आले. संतोषच्या म्हणण्याप्रमाणे हा सांगाडा वनिताचा असून, दि. १२ आॅगस्ट २००६ रोजी संतोषच्या घरातच डोक्यात गज मारून या ठिकाणी तिला गाडले होते. त्यानंतर माती लोटून त्यावरच अंजिराचे झाड लावले होते. गेल्या दहा वर्षांत हे झाड तब्बल वीस फूट उंच झाले होते. (प्रतिनिधी)
वनिता गायकवाड यांचा खून पैशांसाठी!
धोम येथील वनिता गायकवाड (वय ३५) यांना एडस् असल्याचे सांगून भीती घातली. त्यावरील उपचारासाठी त्याच्याकडे आल्यानंतर तो औषध देण्याच्या नावाखाली गायकवाड यांच्याकडून पैसे उकळायचा. त्यांच्याकडून पैसे यायचे बंद झाल्यानंतर त्याने शेवटी त्यांचाही काटा काढला.
सुरेखा चिकणेंचा खून दागिन्यांसाठी !
वडवली येथील सुरेखा किसन चिकणे (वय २३) या महिलेला संतोष पोळने सुरुवातीला गायब केले. वडवली गावातच दवाखाना सुरू
करून २० मे २००३ ला पोळने चिकणे यांना डोळे तपासणीसाठी बोलावून घेतले. सुरेखा चिकणे गायब झाली. त्यावेळी तिच्या अंगावर आठ तोळे सोने होते. सुरेखाचा खून त्याने दागिन्यांसाठीच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगाबाई पोळ यांचा जमिनीच्या व्यवहारातून खून !
धोम गावातीलच जगाबाई लक्ष्मण पोळ (वय ४०) या १२ आॅगस्ट २०१०ला गायब झाल्या होत्या. नागपंचमी दिवशी त्यांना घरातून पोळने बाहेर नेले होते. त्यानंतर २0 गुंठे जमिनीचा कागद करण्याऐवजी त्याने शंभर गुंठ्याचा कागद केला. त्यानंतर पोळ यांना त्याने भुलीचे इंजेक्शन देऊन खून केला.
पुरावा नष्ट करण्यासाठी सलमाचा बळी !
डॉ. घोटवडेकर यांच्या हॉस्पिटलमधील परिचारिका सलमा शेख पोळला भुलीचे औषध पुरवायची. तिला हॉस्पिटल व पोळच्या कृत्यांची माहिती होती. त्यामुळेच पोळने तिचाही काटा काढला.
दागिन्यांसाठी भंडारींचा बळी
नथमल भंडारी ज्या ठिकाणी राहत होते. तेथे संतोष पोळही राहत होता. भंडारी यांच्या घरात सोने होते. याची पोळला कुणकुण लागली होती. ज्या दिवशी भंडारी गायब झाले. त्याच दिवशी त्यांच्या घरातील सोनेही गायब झाले होते. पोळनेच त्यांचे दागिने गायब केले. लुटलेले दागिने तो सराफांकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेत होता.
सहा दिवस कोठडी
मंगल जेधे खूनप्रकरणात संतोष पोळला शुक्रवारी पोलिसांनी वाई न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोळने आणखी काही लोकांना बेपत्ता केल्याचा संशय असून, त्या दृष्टीने तपास करायचा असून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायाधीशांकडे केली.