नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:30 IST2025-05-06T06:30:29+5:302025-05-06T06:30:37+5:30
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या कविता अलदर हिच्या तीन दिवसांच्या बाळाला एक अनोळखी महिला लसीकरणाच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेली ती परत आलीच नाही.

नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने सर्वच सरकारी रुग्णालयांच्या प्रसूती विभागातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची बैठक घेऊन नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करावे, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि या विभागातून बाहेर जाण्याचा आणि येण्याचा एकच मार्ग ठेवा, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या कविता अलदर हिच्या तीन दिवसांच्या बाळाला एक अनोळखी महिला लसीकरणाच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेली ती परत आलीच नाही. बाळाची चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कविता यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आणि बाळाला ताब्यात घेतले.
या घटनेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची रविवारी दुपारी दूरदृश्यप्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसूती विभागातील सुरक्षेविषयी अधिक सजग राहण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
रुग्णालयांनी काय करावे?
नवजात अर्भकाचे लसीकरण प्रसूती विभागातच करावे. प्रसूती विभागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी. विभागातून बाहेर येण्या-जाण्याचा मार्ग एकच असावा.
आत ये-जा करणाऱ्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र नोंदणी वही ठेवावी.रुग्णालय पासचा अचूक वापर आणि कठोर तपासणी करण्यावर भर.
लवकरच सामायिक एसओपी
वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अशा घटना टाळण्यासाठी सामायिक मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली (एसओपी) जारी करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करणे सर्व सरकारी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात येणार आहे.
रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का? याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे.
हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग