स्पर्धा परीक्षेसाठी अचूक अभ्यासतंत्र वापरा
By Admin | Updated: May 29, 2015 23:57 IST2015-05-29T22:41:45+5:302015-05-29T23:57:20+5:30
हर्षल लवंगारे : ‘लोकमत युवा नेक्स्ट’, द युनिक अकॅडमी यांचे आयोजन; विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी

स्पर्धा परीक्षेसाठी अचूक अभ्यासतंत्र वापरा
कोल्हापूर : प्रत्येक क्षणी विद्यार्थीच आहोत, याचे भान ठेवून नियोजनबद्ध आणि अचूक अभ्यासतंत्राचा वापर केल्यास स्पर्धा परीक्षेत यश हमखास आहे़; पण स्वत:बद्दलचा न्यूनगंड, अवास्तव अपेक्षा हे या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यातील अडसर आहेत़ त्यामुळे या अडथळ्यांवर मात करण्यासाठी योग्य नीती आखा, असा कानमंत्र पुणे येथील द युनिक अकॅडमीचे प्रशिक्षक प्रा़ हर्षल लवंगारे यांनी विद्यार्थ्यांना दिला़ निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘द युनिक अकॅडमी’ यांच्यातर्फे येथील शाहू स्मारक भवनात शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ आणि ‘करिअरची संधी’ या विषयावरील सेमिनारचे़
अधिकारपदाची ऊर्मी मनाशी बाळगून युवा वर्ग या कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने उपस्थित होता़ त्यामुळे शाहू स्मारक भवनचे सभागृह खचाखच भरले होते़ या सेमिनारचे उद्घाटन ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘द युनिक अकॅडमी’च्या कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक हंबीरराव घाटगे यांच्या हस्ते झाले़
प्रा़ लवंगारे म्हणाले, ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे स्वरूप पूर्वीच्या तुलनेत बदलले आहे़ अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढली आहे़ त्यामुळे केवळ भरमसाट वाचन करण्यापेक्षा नेमक्या वाचनावर भर देणे आवश्यक आहे़ केवळ जास्त पाने वाचून संपविणे म्हणजे अभ्यास नसून, त्या विषयाचे आकलन आवश्यक आहे़ विशिष्ट चौकटीतील अभ्यास उपयोगाचा नाही़ या परीक्षा म्हणजे एक संघर्षच आहे, याचे भान असणे आवश्यक आहे़
ते म्हणाले, यूपीएससी असो किंवा एमपीएससी असो; या परीक्षांसाठी तुम्ही कसे दिसता, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, यापेक्षा तुमचे अंतरंग काय आहे, तुम्ही काय आणि कसा विचार करता, याची चाचपणी या परीक्षांमध्ये विशेषत: मुलाखतीच्या टप्प्यामध्ये होते़ मुलाखत हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो़ व्यक्तिमत्त्वातील सुधारणा अल्प कालावधीत होत नाहीत़ मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना खूप कमी वेळ मिळतो़ परिणामी निर्णायक क्षणी अपयश पदरात पडू शकते़ त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी उतरत असताना मुलाखतीची तयारी सर्वप्रथम करा़ त्यासाठी या देशाची सामाजिक स्थिती, विभिन्नता, आर्थिक विषमता, राज्यघटना समजून घ्या, असा सल्लाही प्रा़ लवंगारे यांनी
दिला़
यावेळी प्रा़ लवंगारे यांनी यूपीएससी आणि एमपीएससीचा बदललेला अभ्यासक्रम, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी, वर्तमानपत्रांचे वाचन, उपयुक्त पुस्तके, यूपीएससीच्या स्कोअरिंगसाठी निवडावयाचे वैकल्पिक विषय याविषयी मार्गदर्शन केले़ पूर्व आणि मुख्य परीक्षांतील विविध विषयांची माहिती दिली़ तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली़ स्पर्धा परीक्षांकडे वळताना आपण अमुक-तमुक शाखेमधून आलो आहोत; त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जमेल का, हा न्यूनगंड पहिल्यांदा सोडा, असे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)
सभागृह तुडुंब
स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे़ यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे़ याची प्रचिती ‘लोकमत’ आणि ‘द युनिक अकॅडमी’ने शुक्रवारी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या सेमिनारमध्ये आली़ या सेमिनारसाठी युवक-युवतींनी प्रचंड गर्दी केल्यामुळे शाहू सभागृह तुडुंब भरले होते़ विद्यार्र्थ्याची संख्या जास्त असल्यामुळे बसण्यास जागा न मिळाल्यामुळे शेकडो युवक-युवतींनी मोकळ्या जागेत बैठक मारली़ अनेकजण सभागृहाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून जणू अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या संघर्षाचा कित्ता गिरवीत होते़ उपस्थितांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गर्दी लक्षणीय होती़