मराठा आरक्षणासाठी ‘नोटा’ वापरा
By Admin | Updated: September 18, 2016 21:45 IST2016-09-18T21:45:41+5:302016-09-18T21:45:41+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत समाजाने येणा-या प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्रावरील ‘नोटा’ बटनाचा वापर करावा

मराठा आरक्षणासाठी ‘नोटा’ वापरा
योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत समाजाने येणा-या प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्रावरील ‘नोटा’ बटनाचा वापर करावा, असे आवाहन मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डीतील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी राजे मुधोजी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाल मधील वाड्यावर बैठक घेण्यात आली. यात समाजातर्फे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला पुर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित झाले होते. बैठकीत मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शेकडो सूचना आल्याने सध्या मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली नाही. एकच भव्यदिव्य मोर्चा काढून शासनाला समाजाची ताकद दाखवून द्यायची असल्याने घाईगडबड करू नये असा सल्लाही यावेळी देण्यात आला. यामुळे मोर्चाची तारीख नंतर ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाज एकत्र येऊ लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. आता मात्र सर्वांनाच आरक्षणाची गरज असल्याचे पटू लागली आहे. याकरिता सरकारवर दबाव वाढविण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी मांडले. कोपर्डीतील घटनेचा निषेध नोंदविताना अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी करण्यात येऊ नये. यासंदर्भातील कोणतेही पोस्टर, बॅनर लावण्यात येऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. अॅट्रॉसिटी कायद्याला समाजाचा विरोध नाही परंतु यात दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी मांडले.