अमेरिकेच्या टेस्लाचा प्रकल्प राज्यात येणार, सरकारचे प्रयत्न सुरू; मराठवाड्यात व्हावा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 05:38 AM2020-10-24T05:38:28+5:302020-10-24T07:03:32+5:30

गेल्यावर्षी शासनाने नवीन औद्योगिक धोरण आखले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे.

US Tesla project to come to state, government efforts underway; The project should be in Marathwada | अमेरिकेच्या टेस्लाचा प्रकल्प राज्यात येणार, सरकारचे प्रयत्न सुरू; मराठवाड्यात व्हावा प्रकल्प

अमेरिकेच्या टेस्लाचा प्रकल्प राज्यात येणार, सरकारचे प्रयत्न सुरू; मराठवाड्यात व्हावा प्रकल्प

Next

मुंबई : पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहननिर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीच्या टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा, यासाठी शासन सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली. 

गेल्यावर्षी शासनाने नवीन औद्योगिक धोरण आखले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा, असे राज्य शासनाच्यावतीने उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. टेस्ला कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलती दिल्या जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

टेस्ला कंपनीने वाहननिर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र राज्यात सुरू करावे, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा राज्य शासन पुरविल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. प्रदूषण कमी करण्यास पर्यावरणपूरक वाहननिर्मितीला चालना देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने काही धोरण निश्चित केले आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

विशेषत: मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी टेस्ला कंपनीच्या वतीने रोहन पटेल (ग्लोबल डायरेक्टर, टेस्ला), डॉ. सचिन सेठ हे चर्चेत सहभागी झाले होते. टेस्लासाठी महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविशिल्डपासून सुरुवात 
टेस्लाच्या या प्रकल्पासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्पर्धा लागली असून, ठाकरे सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी किया या मल्टिनॅशनल कंपनीचा प्रकल्प राज्यातून गेला आहे. 

टेस्लाबाबत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पश्चिम महाराष्ट्रात उद्योगांचे केंद्रीकरण झाल्यामुळे टेस्लाचा हा प्रकल्प मराठवाड्यात आल्यास या भागातील विकासाला चालना मिळू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
 

Web Title: US Tesla project to come to state, government efforts underway; The project should be in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.