कुत्र्यांची नगरविकास सचिवांकडून दखल
By Admin | Updated: August 15, 2016 05:02 IST2016-08-15T05:02:39+5:302016-08-15T05:02:39+5:30
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे.

कुत्र्यांची नगरविकास सचिवांकडून दखल
सुरेश लोखंडे,
ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे. त्यावर गांभीर्याने तोडगा काढला जात नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात तीन महिन्यांच्या कालावधीत कुत्र्यांनी दोन हजार ७५७ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांंमुळे नगरविकास सचिवांनी आता प्रशासन सतर्क केले आहे.
सध्या ही जिल्ह्यातील शहरे व निवासी वस्त्यांमधील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. गर्भधारणेच्या या कालावधीत त्यांचे रेबीज जीव घेणे ठरत आहेत. चावा घेतल्यानंतर वेळीच औषधोपचार न झाल्यामुळे जीवाला मुकावे लागल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत. परंतु मागील तीन महिन्यातील घटनांमध्ये सर्वाना वेळेत रेबीजचे इंजेक्शन देऊन संकटातून मुक्त केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांव्दारे केला जात आहे. या घटना टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत मात्र त्यांच्याकडून मौन बाळगले जात आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात तीन महिन्यात सुमारे एक हजार १५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मे महिन्यात सर्वाधिक ५०६ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्याना चावा घेतला आहे. या खालोखाल जूनमध्ये ४११ जणांवर तर जुलैमध्ये २३३ जणाचा कुत्र्यांनी वेठीस धरून चावा घेतला आहे. याप्रमाणेच जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधील एक हजार ६०७ जणांना देखील कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्यास तोंड द्यावे लागले आहे. यात सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील ७१९, अंबरनाथमधील ४३७, शहापूरचे २३५, मुरबाडमधील १४८ आणि कल्याण ग्रामीणच्या ६८ जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याचे निदर्शनात आले आहे.
कुत्र्यांच्या या जीव घेण्या हल्लास गांभीर्याने घेतल्याचे स्थानिक प्रशासनाकडून दाखविले जात आहे. त्या नावाखाली लाखो रूपयांचे खर्च कुत्र्यांच्या नसबंदीवर केल्याचे ही निदर्शनात आले आहेत. मात्र कुत्र्यांचा हैदास अद्यापही कमी होत नसल्यामुळे नागरिकांना जीव घेण्या हल्ल्यास तोंड द्यावे लागत आहे. केवळ खर्चावर जोर देणाऱ्या स्थानिक प्रशासनावर आता नगरविकास विभागाच्या सचिवांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मुलन करणे आणि नागरिकांवर होणारे कुत्र्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना व देखरेख समिती ठिकठिकाणच्या पातळ्यावर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ठाणे ते माजिवडा ही मार्ग क्र. २७ ची बस दुपारी २ च्या सुमारास रेल्वे स्थानक येथून माजिवडा गावात आली. तिथून ती परतीच्या मार्गावर होती. तत्पूर्वी चालक यशवंत राव यांना गाडी मागे घेण्यासाठी थोरात हे मदत करत होते. त्याच वेळी एका पिसाळलेल्या श्वानाने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला.
अचानक गुदरलेल्या या प्रसंगामुळे थोरात यांची भंबेरी उडाली. याच बसमधून रेल्वे स्थानकावर जाणारे टीएमटीचे वाहतूक निरीक्षक सुनील साठे, गणेश माहूलकर यांच्यासह चालक यशवंत यांनी त्यांना तातडीने ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुगणालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.