NCP Nawab Malik News: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्ष न नेमता समिती नेमली आहे.
मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर - पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर - मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.
दरम्यान, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना लातूर येथे पत्रकार परिषदेत मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा पक्षाने तातडीने राजीनामा घेतला होता. कारवाईला महिना होण्याच्या पूर्वी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन बढती देण्यात आल्याचे समजते.