अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 05:52 AM2024-04-21T05:52:09+5:302024-04-21T05:53:01+5:30

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

Unseasonal rain Many districts of Marathwada, Konkan affected, heavy damage in maharashtra | अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान

अवकाळी पाऊस पाठ सोडेना! मराठवाडा, कोकणातील अनेक जिल्ह्यांना फटका, अतोनात नुकसान

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला वादळी पाऊस आणि गारपीट पिच्छा सोडायला तयार नाही. शनिवारीही मराठवाड्यासह कोकणातील अनेक भागात वादळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. 

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात  शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्या. यामुळे आंबा, द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य तालुक्यातही सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

मंदिरात पाणीच पाणी
धाराशिव जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. तुळजापुरात झालेल्या धो-धो पावसामुळे बाहेरील पाणी मंदिराच्या परिसरात शिरले होते. उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वीज पडल्यामुळे सात शेळ्या ठार झाल्या, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच याच तालुक्यातील तलमोड, तुरोरी, तुगाव येथे वीज पडून तीन पशुधन दगावले आहे.   

हिंगोलीमध्ये हळदीचे नुकसान 
हिंगोली जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. सायंकाळी हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

कुठे अवकाळी, तर कुठे उन्हाळा
उष्णतेच्या लाटांसह अवकाळी पावसाने नागरिकांना नकोसे केले असून, हवामान बदलाचा हा कहर सुरूच आहे. आता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासोबत हलका पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर मुंबईतील उष्णतेची लाट ओसरली असली तरी आर्द्रतेत चढउतार असल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण व दमट परिस्थिती राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी रात्री हवामान उष्ण राहील. २९ जिल्ह्यांत या सप्ताहात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Web Title: Unseasonal rain Many districts of Marathwada, Konkan affected, heavy damage in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस