बुलडाणा जिल्ह्यातील 300 गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य!
By Admin | Updated: August 19, 2016 17:40 IST2016-08-19T17:40:21+5:302016-08-19T17:40:21+5:30
जिल्ह्यातील २९७ गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत असून या गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे

बुलडाणा जिल्ह्यातील 300 गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य!
गणेश मापारी
जि.बुलडाणा,दि. १९ : जिल्ह्यातील २९७ गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत असून या गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील ९३२ पाणी नमुने जुलै महिन्यात तपासले असून यापैकी २९७ गावांमधील पाण्याचे नमुने दुषीत आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी ३२ टक्के दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या स्त्रोतामध्ये मिसळत असल्याने जलजन्य आजारात वाढ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. जुलै महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तसेच जलाशयांची पातळी सुध्दा वाढली आहे. अनेक गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या पाण्यांच्या नमुन्यानुसार जिल्ह्यात ३२ टक्के दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचे समोर आले आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जुलै महिन्यात जिल्ह्यातील ९३२ गावांमधील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी २९७ गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी संबधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक गावातील जलसुरक्षकांना आता पाण्याच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याची ग्रामपंचायतीच्या उपाययोजनेनंतर आणखी एकदा तपासणी केली जाणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत दुषीत पाण्याचा पुरवठा करण्यात येवू नये, असे निर्देश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिले आहे.
शेगाव तालुका अग्रस्थानी
पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध गावांमधील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने प्रयोग शाळेत तपासले आहेत. शेगाव तालुक्यातून १८ पाणी नमुने तपासण्यात आले असून यापैकी १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शेगाव तालुक्यात सर्वाधिक ७२ टक्के दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन दिसून येत आहे.
जुलैमध्ये वाढला दुषीत पाण्याचा पुरवठा
जून महिन्यामध्ये जलाशयांची पातळी कमी होते. त्यामुळे पिण्यासाठी अनेक ठिकाणी दुषीत पाण्याचा वापर केला जातो.
आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ६९४ पाणी नमुने तपासले. यापैकी २०४ गावांमध्ये दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याने संबंधित ग्रामंपचायतींना नोटीस देवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. ४तर जुलै महिन्यात दुषीत पाणी पुरवठा करणाऱ्या गावांमध्ये १०० गावे वाढली आहेत. जुलै महिन्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २९७ गावांमध्ये दुषीत पाणीपुरवठा केल्या जात आहे.
ग्रामीण भागात नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. तर शहरी भागात नगर परिषदांनी पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य असल्याबाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या तपासणी नुसार जिल्ह्यात ३२ टक्के पाणी पुरवठा दुषीत पाण्याचा होत आहे. हि गंभीर बाब असून पिण्यास योग्य अशा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाय योजना सुरु केल्या आहेत.
-डॉ.व्ही.एम.डुकरे पाटील, वैद्यकीय अधिकारी साथरोग विभाग बुलडाणा