मुंबईतून विनापरवाना औषधे परदेशात

By Admin | Updated: September 12, 2014 02:37 IST2014-09-12T02:37:04+5:302014-09-12T02:37:04+5:30

उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असतांना नियम धाब्यावर बसवून औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचे स्पष्ट होत आहे.

Unprivileged drugs abroad from Mumbai | मुंबईतून विनापरवाना औषधे परदेशात

मुंबईतून विनापरवाना औषधे परदेशात

अजय महाडिक, मुंबई
‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असतांना नियम धाब्यावर बसवून औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचे स्पष्ट होत आहे. विनापरवाना औषधनिर्मिती करणे, त्यांची विक्री करणे व त्या रसायनांची निर्यात करणे एफडीए (अन्न व औषध प्रशासन)च्या कायद्याप्रमाणे गंभीर गुन्हा आहे. मात्र याप्रकरणी एफडीए अंधारात असून ‘लोकमत’ने एफडीएचे सहायक आयुक्त गि.खु. वखारिया यांच्याकडे पुरावे सादर केले असता त्यांनी याची गंभिर दखल घेत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले.
‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ला दिलेले परवाने विशिष्ट कालावधीसाठी असून, त्यात दिलेल्या मार्गदर्शक आराखड्यानुसारच ही निर्मिती करणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीने परवान्यातील मार्गदर्शक तत्त्वांनाच फाटा देत औषधनिर्मिती केली आहे. या औषधांच्या खरेदी-विक्री संदर्भात देशी व परदेशी कंपन्यांबरोबर झालेला व्यवहार अ‍ॅक्सिस बॅँकेच्या वसई शाखेतून झाला आहे.
या प्रकरणी कंपनीच्या एचआर सुगन्या कृष्णन व कॉलिटी कंट्रोल हेड नागनाथ केसकर यांनी हात वर करत व्यवस्थापनाकडे बोट दाखवले, तर उमंग फार्माटेकचे मालक व व्यवस्थापकीय संचालक राजकुमार बुद्धराज यांना ‘लोकमत’ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी औषधनिर्मिती व वितरण या क्षेत्रातील कंपनी असून, २००९ ते २०१३ या वर्षांसाठी या कंपनीला मूळ परवाना मिळाला आहे. मात्र या परवान्याची मुदत संपल्यानंतरसुद्धा या कंपनीने आपले उद्योग सुरू ठेवले आहेत.

Web Title: Unprivileged drugs abroad from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.