विद्यापीठ कुलगुरु निवडीच्या जाचक अटींमुळे शास्त्रज्ञांच्या आशा धुसर
By Admin | Updated: November 26, 2014 00:01 IST2014-11-25T22:27:01+5:302014-11-26T00:01:15+5:30
पाच वर्षांत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत आयसीआरच्या संशोधन केंद्रात काम केलेली व्यक्ती कुलगुरु म्हणून विराजमान झाली

विद्यापीठ कुलगुरु निवडीच्या जाचक अटींमुळे शास्त्रज्ञांच्या आशा धुसर
शिवाजी गोरे - दापोली -महाराष्ट्रातील कृषी धोरणाला गती देण्यासाठी राज्यात चार कृषी विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. मात्र, अलीकडे सरकारच्या आठ वर्षे प्राध्यापक संवर्गातील अनुभव व त्यातील पाच वर्षे संचालक पदाचा अनुभव अशा कुलगुरु निवडीच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या उदयोन्मुख शास्त्रज्ञांच्या आशा धुसर बनल्याने नाराजी पसरली आहे.कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल २० डिसेंबर रोजी पूर्ण होत असल्याने कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, कोकण कृषी विद्यापीठातील एकही शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संचालक, कुलगुरु निवडीसाठी पात्र नाही. शासनाने पाच वर्षे संचालकांचा अनुभव ही अट लागू केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. सन २००८पासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील संचालक पदे भरलेली नाहीत. संचालक होण्यासाठी कमीत कमी पाच वर्षे प्राध्यापक व त्यावरील १० वर्षांचा अनुभव असेल तरच पाच वर्षांचा संचालकांचा अनुभव असू शकतो. परंतु २००८ पासून कोणतीही पदे भरलेली नाहीत. त्यामुळे प्राध्याकांना संचालक पदांची संधी मिळाली नाही. त्याचबरोबर २००८ पासून संचालक पदे न भरल्याने संचालकाचा पाच वर्षांचा अनुभव पूर्ण होऊ शकत नाही. संबंधित शास्त्रज्ञाला शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तिन्ही शाखांचा अनुभव अपेक्षित आहे. असा अनुभव असलेली व्यक्ती म्हणजे विभागप्रमुख होय. परंतु ही पदे रिक्त आहेत. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील १२ संचालकांपैकी केवळ ३ संचालक आहेत, तर ९ संचालकांचा कार्यभार अतिरिक्त आहे. अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या संचालकांचा अनुभव मात्र ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे त्या पदाला न्याय देऊनसुद्धा सर्व्हिसमध्ये फारसा उपयोग होत नाही. अतिरिक्त पदभार सांभाळताना कसरत करावी लागते. परंतु त्या पदावर काम केल्याचे समाधान मिळत नाही. कृषी विद्यापीठातील संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही कृषी विद्यापीठांतील संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही शाखांची कामे विद्यापीठातील शास्त्रज्ञांना करावी लागतात. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा फायदा कुठेही होत नाही. त्याउलट आयसीआरच्या एखादी संशोधन केंद्रात प्रमुख म्हणून काम केलेली व्यक्ती राज्यातील विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून येत आहे.
पाच वर्षांत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत आयसीआरच्या संशोधन केंद्रात काम केलेली व्यक्ती कुलगुरु म्हणून विराजमान झाली. यामध्ये परभणी कृषी विद्यापीठाचे डॉ. वेंकटेश्वरलू, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दाणी, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मोरे, दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. लवांडे या चारही कुलगुरुंनी आयसीआरमध्ये संचालक म्हणून काम केले होते.
कुलगुरुपदाच्या जाचक अटीमुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी भुमिपुत्रांना संधी मिळण्याची आशा धुसर बनली आहे. तसेच राज्यातील संचालक पदे न भरल्याने पुढील पाच वर्षे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मराठी माणूस दिसेल, असे वाटत नाही.