‘एरोमॉडेलिंग’च्या जादुगाराची अनोखी झेप
By Admin | Updated: August 12, 2014 01:13 IST2014-08-12T01:13:06+5:302014-08-12T01:13:06+5:30
काही लोक इतिहास घडताना पाहतात, परंतु मोजक्या लोकांना इतिहास घडविण्यात जास्त रस असतो. शिक्षण, अभ्यास अन् पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कधी कधी जास्त महत्त्वाचा ठरतो.

‘एरोमॉडेलिंग’च्या जादुगाराची अनोखी झेप
अनुभवाला जिद्दीची जोड : राजेश जोशी यांना मानद ‘पीएचडी’
योगेश पांडे - नागपूर
काही लोक इतिहास घडताना पाहतात, परंतु मोजक्या लोकांना इतिहास घडविण्यात जास्त रस असतो. शिक्षण, अभ्यास अन् पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव कधी कधी जास्त महत्त्वाचा ठरतो. अन् अनुभवाला जर जिद्द आणि कष्टांची जोड मिळाली तर क्या कहने! उपराजधानीत ‘एरोमॉडेलिंग’चे ‘कल्चर’ रुजविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या राजेश जोशी यांनी ही बाब प्रत्यक्षात आणून दाखविली आहे.
गेल्या अडीच दशकांपासून जळी, काष्ठी अन् पाषाणी केवळ ‘एरोमॉडेलिंग’च्या विमानांचाच ध्यास घेतलेल्या जोशी यांना ‘आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ने मानद ‘पीएचडी’ प्रदान केली आहे. या विषयावरील ही पहिलीच ‘पीएचडी’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे जोशी यांनी या विषयात कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसले तरी, यावरील त्यांची पकड भल्याभल्यांना अचंबित करणारी आहे.राजेश जोशी यांनी ‘एनसीसी’च्या माध्यमातून ‘एरोमॉडेलिंग’चे धडे घेतले. या विषयातील कुठलेही शास्त्रोक्त पुस्तकी शिक्षण घेतले नसतानादेखील त्यांनी निरनिराळे प्रयोग करून विविध धाटणीची आणि डिझाईनची विमाने बनविली.
इतकेच नव्हे तर निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी २६ हून अधिक पदकेदेखील मिळविली आहेत.
चांगली सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ‘एरोमॉडेलिंग’वरील आपले प्रेम कधी कमी होऊ दिले नाही. निरनिराळी पुस्तके व प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:च बारीक तांत्रिक बाबीदेखील जाणून घेतल्या. ‘एरोमॉडेलिंग’चे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यास सुरुवात केली.
दोन वर्षांअगोदर २१ फुटांचे ‘एरोमॉडेलिंग’चे विमान तयार केल्याबद्दल ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्डस्’मध्ये त्यांचे नाव नोंदविण्यात आले होते.
आता ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
उपराजधानीचे नाव उंचावले
उपराजधानीला मध्य भारताचे शैक्षणिक ‘हब’ मानण्यात येते. विशेषत: येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये असून निरनिराळे अभ्यासक्रम येथे चालतात. परंतु ‘एरोमॉडेलिंग’बद्दल नागपुरात फारशी जागरूकता दिसून येत नव्हती. परंतु गेल्या ३२ वर्षांपासून ‘एरोमॉडेलिंग’च्या क्षेत्रात असणाऱ्या राजेश जोशी यांच्या प्रयत्नांमुळे नागपुरातील विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल रस निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’सारख्या नामवंत संस्थांमधील स्पर्धांत पहिला क्रमांक पटकावून उपराजधानीचे नाव उंचावले आहे.