“उदयनराजेंना लवकरच खूप मोठी जबाबदारी देणार आहोत”; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 19:04 IST2023-05-07T19:03:30+5:302023-05-07T19:04:45+5:30
BJP MP Udayanraje Bhosale News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून आम्ही चांगले काम करण्याची नेहमीच प्रेरणा घेत असतो, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.

“उदयनराजेंना लवकरच खूप मोठी जबाबदारी देणार आहोत”; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती
BJP MP Udayanraje Bhosale News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जाहीर केलेली निवृत्ती आणि त्यानंतर मागे घेतलेला निर्णय, बारसू रिफायनरी प्रकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली राज्यपालांची भेट, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी सुरू केलेली तयारी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लागलेले लक्ष यांवरून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे आगामी काळात लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्यात आले आहेत. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले. मंत्री मिश्रा यांनी त्यानंतर येथील भवानी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी राजमाता कल्पनाराजे भोसले व उदयनराजे यांच्यासोबत मिश्रा यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत
ज्या घराण्यावर संपूर्ण जग प्रेम करते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून आम्ही चांगले काम करण्याची नेहमीच प्रेरणा घेत असतो. अशा घराण्याकडून झालेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. आज आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटले आहे.