“उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे”; रामदास आठवलेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 22:59 IST2022-06-22T22:59:08+5:302022-06-22T22:59:53+5:30
रामदास आठवले यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

“उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे”; रामदास आठवलेंचा टोला
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. दिवसभरातील घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. यानंतर भाजपसह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यातच केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या काव्य शैलीतून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
रामदास आठवले यांनी अनेकदा शिवसेना आणि भाजपची युती व्हायला हवी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावे, असेच म्हटले आहे. आता शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केल्यानंतर त्यावरही आपल्या काव्यात्मक शैलीतून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे
एकीकडे युतीचे आवाहन करताना रामदास आठवले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि त्याच्या कार्यशैलीवर जोरदार टीकास्त्र सोडतात. यानंतर आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे, या शब्दांत रामदास आठवले यांनी चिमटा काढला.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधत बंडखोरी केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर तसे समोर येऊन सांगा. माझा राजीनामा मी तयार ठेवतो. केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही मी तयार आहे. मात्र, हे सगळं तुम्ही समोर येऊन सांगा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असा प्रश्न करत, वर्षा बंगला सोडून आता मी मातोश्रीवर जातो, असे सांगत अनेक भावनिक मुद्द्यांना हात घातला. याला, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले.