त्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे! शरद पवारांसमोर नितीन गडकरी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:16 IST2021-10-02T13:15:23+5:302021-10-02T13:16:24+5:30
अहमदनगरमधील कार्यक्रमात शरद पवार, नितीन गडकरी एकाच मंचावर

त्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे! शरद पवारांसमोर नितीन गडकरी स्पष्टच बोलले
अहमदनगर: महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल, तिथे तिथे आम्ही गुंतवणूक करू, असं केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं.
पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दूग्धोत्पादनाचं यावेळी गडकरींनी कौतुक केलं. एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जितकं दूध संकलित होतं, तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी त्यांनी दूध उत्पादनाबाबतचा एक किस्सा सांगितला. 'एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरीच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे ३ लाख लिटर दूध संकलित होतं, ते १० लाख लिटर कसं होईल? त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला. एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध संकलित होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते. आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. त्यामुळे तो आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.