Amit Shah Birthday Call: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी ६५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विरोधकांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही रविवारी वाढदिवस होता. पण अमित शाह यांच्याकडून आष्टीकरांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारे शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागेश पाटील आष्टीकर आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच दिवशी वाढदिवस होता. मात्र अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंऐवजी नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अमित शाह यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दुसरीकडे अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्टही केलेली नाही. दुसरीकडे आष्टीकरांना फोन गेल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दुसरीकडे, फेब्रुवारी महिन्यात शिंदे गटाच्या मंत्र्याने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी हजेरी लावल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत सर्व खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती.