बालरंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट
By Admin | Updated: November 5, 2014 00:07 IST2014-11-04T21:22:29+5:302014-11-05T00:07:37+5:30
आहेत मूक - बधीर परि... : त्यांच्या चेहऱ्यावर दिसते अभिनयाची जादू

बालरंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट
शोभना कांबळे - रत्नागिरी -मूक - बधीर असले तरी त्यांनाही शिकण्याचा हक्क आहे. या मुलांना संधी मिळाली तर ती अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात आणि मग बालनाट्य रंगभूमीही ही मुले काबिज करतात, हे येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूक-बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण फाटक यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
मूक - बधीर मुले बोलू शकत नाहीत किंवा ऐकू शकत नाहीत. त्यामुळे सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणी येतात. पण, या विद्यालयात अडीच ते १८ वर्षांपर्यंतची ही मुले विविध कौशल्ये आत्मसात करायला शिकत आहेत. ‘करपल्लवी’ (सांकेतिक चिन्ह)च्या सहाय्याने त्यांचे संभाषण होते. पण, त्यांच्या हस्तकौशल्यातून विविध कला साकारण्याची जादूही या मुलांमध्ये आहे. त्यांच्यातील अभिनय कलेला व्यासपीठ मिळवून देऊन फाटक यांनी या मुलांमधील अभिनय अधिक प्रगल्भ केला. म्हणूनच या शाळेची बालनाट्ये अगदी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
या मुलांमध्ये अभिनय विकसीत करण्यासाठी मुंबईच्या नाट्यशाळेने २०१० साली विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या आठ दिवसांच्या सृजनशील नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेने जादुची कांडी फिरावी, तशी माझ्यासारख्या विशेष शिक्षकाने लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वेशभूषाकार घडविले. लोखंडाला सोन्याचा स्पर्श झाला की, त्याचे सोने नाही तर त्याचा परिसच झाल्यासारखे वाटले, असे सांगत फाटक पूर्व स्मृती जागृत करतात.
कार्यशाळेतून मिळालेल्या या मार्गदर्शनाचा उपयोग करून १९९५मध्ये कै. केशव परशुराम अभ्यंकर मूक - बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘याला जीवन ऐसे नाव’ हे बालनाट्य बसवले. चिपळूण येथील नाट्य संमेलनात ही नाटिका बसवली. या संमेलनासाठी आलेले ज्येष्ठ रंगकर्मी राजा गोसावी यांनी जेव्हा ही नाटिका पाहिली, तेव्हा ही मुले कर्ण - बधीर आहेत, यावर विश्वासच बसेना. नाट्यशाळेच्या राज्य नाट्य स्पर्धेत या नाटिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. शिवाय लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि अभिनयाची वैयक्तिक बक्षिसे मिळाली ती वेगळीच.
या नाटिकेने प्रचंड आत्मविश्वास मिळवून दिला. या नाटकाचे नेपथ्य, यातील ड्रेपरी सारं काही मुलांकडूनच करून घेतलं होतं. कर्ण - बधीर मुले स्वत:हून छोटे छोटे शब्द उत्स्फूर्तपणे उच्चारू लागली. शब्दांच्या जोडीला अभिनयाची जोड मिळाल्यामुळे ही मुले कर्ण - बधीर आहेत, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही, ही यशाची पहिली पायरी होती, असे फाटक सर
म्हणतात.
अशा अनेक आठवणींना अरूण फाटक उजाळा देतात. ते म्हणतात, जेव्हा ही मुलं, पालक, समाज, शिक्षक आहे ती परिस्थिती स्वीकारून आनंदनिर्मितीच्या कार्याला लागतात, तेव्हाच तिथे सृजनशीलतेची फुले फुलतात आणि विशेष मुलांचीही रंगभूमी विकसित होेत जाते, अशा शब्दांत फाटकसर भावना व्यक्त करतात.
हरखणारं यश...
१९९६ साली झालेल्या दुसऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत कै. केशव परशुराम अभ्यंकर मूक - बधीर विद्यालयाच्या ‘वाल्याचा झाला वाल्मिकी’ या नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर या मुलांचा अनोखा प्रवास सुरू झाला. नाशिक येथे झालेल्या ७७व्या नाट्य संमेलनात या मूक - बधीर विद्यालयाने सांस्कृतिक रजनी गाजवली. ‘कथा ही गंगारामाची’ हे नाटक सादर केले, तर अस्वलासह आलेल्या दरवेशीने या मुलांना मुलाखत दिली. या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते त्यावेळी बक्षीस प्रदान करण्यात आले.
रंगभूमी
दिन विशेष