‘खाकी’चा धाक दाखवत अनधिकृत बांधकाम
By Admin | Updated: August 15, 2016 03:26 IST2016-08-15T03:26:30+5:302016-08-15T03:26:30+5:30
पोलीस अधिकाऱ्याने रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत चेंबूरच्या विष्णूनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे.

‘खाकी’चा धाक दाखवत अनधिकृत बांधकाम
मुंबई : वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत चेंबूरच्या विष्णूनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत रहिवाशांनी पालिकेसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार केली असली तरी अद्यापही याप्रकरणी काहीच कारवाई झालेली नाही.
चेंबूरचा विष्णूनगर परिसर पुर्णपणे झोपडपट्टीचा असून तो डोंगरावर वसला आहे. काही वर्षांपूर्वी डोंगराचा काही भाग कोसळल्याने झोपडीधारकांना पालिकेने दुसऱ्या ठिकाणी जागा दिली. यात या पोलीस अधिकाऱ्याच्या घराचा समावेश होता. पूर्वी हा पोलीस अधिकारी याच परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तेव्हापासून तो येथे रहिवाशांसोबत दादागिरी करत जागा बळकावत आहे. पालिकेने पर्यायी जागा दिल्यानंतर तो राहत असलेली पूर्वीची जागा ही रिकामी होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून याठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाचा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र काही महिन्यांपूर्वी हा पोलीस अधिकारी पुन्हा याठिकाणी आला. त्याने पुन्हा ही जागा काबीज करुन येथे दोन झोपड्या उभ्या केल्या आहेत.
येथील रहिवाशांनी या अनधिकृत बांधकामाला अनेकदा विरोध केला. मात्र हा पोलीस अधिकारी रहिवाशांना खाकीचा धाक दाखवत त्यांचा आावाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काही रहिवाशांनी त्याच्याविरोधात पालिका आणि वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याने संबंधितांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रहिवाशांंमध्ये भीतीचे वातावरण असून ही जागा हडपल्याने यावर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा कुठे करायची? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा अधिकारी याठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे करत आहे. पहिल्यांदा पत्र्याचे घर तयार केल्यानंतर काही दिवसांनी ही घरे पक्की करुन तो विकत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे गृह विभागाने अशा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पालिका आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई न केल्यास पालिका आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा येथील मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)