‘मुक्त’च्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक
By Admin | Updated: July 13, 2016 21:07 IST2016-07-13T21:07:18+5:302016-07-13T21:07:18+5:30
मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला

‘मुक्त’च्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक
सतीश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कुलगुरूंनीच मौन साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश असल्याने ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डीएमएलटी, बीएससीआयडी, बी. ए. डिझायनिंग अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. शिवाय या अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्कदेखील हजारो रुपये असल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.
दरम्यान याप्रकरणी कुलगुरू तथा विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण रद्द केलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय तसेच या अभ्यासक्रमांची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा रोजगाराच्या संधी कितपत असतील असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
---
पत्रकारिता अभ्यासक्रमाची मान्यता रद्द
मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाची पदवी घेऊन राज्यातील विविध भागात पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सद्यस्थितीत पत्रकारिता या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाची मान्यताच रद्द केली गेल्याने या पदवीला कितपत महत्त्व असेल याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. विद्यापीठाने यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
---
आय अॅम नॉट अवेयर
कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविल्याने नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. एकनाथ जाधव यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘आय अॅम नॉट अवेयर’ अशा शब्दामध्ये विषयाला बगल दिली. मी विद्यापीठात नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे मला या विषयाची काहीच कल्पना नसल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.