उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:27 IST2025-07-17T06:26:39+5:302025-07-17T06:27:03+5:30

Vidhan Parishad: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला.

Uddhavji, you have scope to come to power; Fadnavis' 'offer', funny argument in Vidhan Sabha | उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल, अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये रंगली.

 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी झालेली भाषणे ही एकमेकांची टोप्या उडविणारी आणि सध्याच्या राजकीय गरमागरमीत वातावरण हलकेफुलके करणारी ठरली.
 फडणवीस म्हणाले, दानवे यांचा कार्यकाळ संपत असला तरी ते पुन्हा सभागृहात आल्यावर त्यांनी याच पदावर काम करावे, असे काही नाही. असे म्हटल्यावर उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवापळवी करतो. त्यावर उद्धव ठाकरे यांनी समोरच्या बाकावरून टिप्पणी करताच २०२९ पर्यंत तरी आम्ही विरोधकांच्या बाजूला येण्याचा काहीच स्कोप नाही, असेही फडणवीस म्हणाले.

अशा खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या भाषणांमधून आलेली ऑफर त्याच पद्धतीने घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी नंतर दिली.

‘तुम्ही बहुमत सिद्ध केले नाही, आम्ही केले’

फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी दानवे यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. उद्धवजी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पत्र पाठविले. त्यानंतरही कॅबिनेट घेऊन त्याला तुम्ही मंजुरी दिली. राज्यपालांनी पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येत नाही, त्यामुळे ती अधिकृत नव्हती. पण, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याला उशिरा आलेले शहाणपण म्हणतात. तुम्ही बहुमत सिद्ध केलेले नाही. पण, आम्ही ते सिद्ध केले. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून तो प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून घेतला, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

‘त्याच पक्षातून पुन्हा येईन असे म्हणा...’

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म दानवे पूर्ण करत आहेत. त्यामुळे पुन्हा येईन, असे तुम्हीही जोरात म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे. पण, त्याच पक्षातून पुन्हा येईन, असे म्हणा. दानवेंचे कौतुक ऐकून बरे वाटले. कारण, उमेदवारी जाहीर केली तेव्हा आज कौतुक करणारे वेगळाच चेहरा करून बसले होते. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. पण, ते मला धन्यवाद देतील की नाही, माहीत नाही. कारण, त्यांनीही माझ्याकडून काही लोक घेतले आहेत, असा चिमटा काढला.

Web Title: Uddhavji, you have scope to come to power; Fadnavis' 'offer', funny argument in Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.