Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:20 IST2022-01-22T13:06:52+5:302022-01-22T13:20:29+5:30
Uddhav Thackeray : आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष
- अल्पेश करकरे
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार?
उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील, त्यावेळी कोणत्या मुद्द्यांवर संवाद साधतील आणि काय मार्गदर्शन करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आगामी मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेनेची आगामी निवडणुकांमधील वाटचाल आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी या विषयावर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे या संवादाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या निमित्तानं कानमंत्र देणार अशी माहिती मिळत आहे. तसेच गेल्या दोन वर्षात काय काम जनतेसाठी करण्यात आली, याविषयी आणि पक्षसंघटन कशाप्रकारे मजबूत करून पुढे आगामी सर्वच निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवता येईल, या विषयी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. पक्षात होणारे मतभेद तसेच विविध चर्चा याविषयी देखील उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे, याच निमित्ताने बाळासाहेबांचे विचार देशभर कसे पोहोचवता येतील याविषयी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मोठी गर्दी होतेय, पण...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईला हजेरी लावत असतात. शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवप्रेमींचा जनसागर मुंबईत येत असतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवादाद्वारे शिवसैनिकांशी संवाद करतील. हा संवाद 23 जानेवारी रात्री आठ वाजता झूम वरून साधणार आहेत आहेत.
आगामी निवडणुकांसाठी उद्याचा संवाद महत्त्वाचा असेल
उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच दिवसांपासून शिवसैनिकांशी संवाद साधलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधतील. या संवादाकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कानमंत्र देणार असल्याची माहिती शिवसेना सुत्रांनी दिली आहे, त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी असणारा संवाद महत्त्वाचा असणार आहे. राज्यात येत्या काळात मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळात पार पडतील. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र देणार आहेत, जेणेकरून महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना घराघरात आणि स्थानिक पातळीवर ही सत्तेत येईल.