Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 10:04 IST2023-02-23T09:02:32+5:302023-02-23T10:04:39+5:30
शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले होते. यावेळी त्यांनी धनुष्यबाण दाखविला होता.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला? मुख्यमंत्र्यांची बोलकी प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह येत खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी देव्हाऱ्यातील छोट्या धनुष्यबाणाची प्रतिकृती दाखविली होती. हा धनुष्यबाण शिंदे यांनीच बाळासाहेबांना भेट दिला होता असे सांगितले जात आहे.
औरंगाबाद-मुंबई हायवे जवळ साजापूर परिसरामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी शिंदे औरंगाबादला आले होते. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना गिफ्ट दिलेला का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला. यावर शिंदे यांनी मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले होते. यावेळी त्यांनी धनुष्यबाण दाखविला होता.
धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असे शिंदे म्हणाले. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहे आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे आम्ही कामाने उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे तसे झाले, असे शिंदे म्हणाले.