मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं पुढे आलं आहे. संसदेच्या अधिवेशन काळात ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलं आहे. त्यात ठाकरे खासदारांची बैठक आणि इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं पुढे आलंय. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी, सोनिया गांधींसह इतरांनी भेट घेतली होती. मात्र आता ठाकरेंचा दिल्ली दौरा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांत सुरू होतंय त्यात उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जातायेत. यावेळी ते पक्षाचे खासदार यांची बैठक घेणार आहेत त्याशिवाय इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नुकतेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत दावा केला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार हे लवकरच केंदात भाजपासोबत जाताना दिसतील असं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक-दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं कडू यांनी म्हटलं होते.
दरम्यान, याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. ही भेट विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा यावरून झाल्याचं सांगण्यात आले. मात्र या भेटीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यात काँग्रेस-ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून पराभव पत्करावा लागला. ठाकरे गटाचे अवघे २० आमदार विधानसभेत निवडून गेले. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस याच्याशी जवळीक साधत त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. तेव्हापासून ठाकरे भाजपासोबत येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.