“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:21 IST2025-12-11T18:19:39+5:302025-12-11T18:21:42+5:30
Uddhav Thackeray PC News: निवडणूक लढवताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची थाप मारली होती. तशीच थाप राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना मारली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेत सत्ताधारी विरोधकांत व कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टोलेबाजीला सामोरे जात योजना कधीही बंद होणार नाही व 'योग्यवेळी' २१०० रुपये दिले जातील, असे स्पष्ट केले. यानंतर आता पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत आव्हान दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारांना लाडकी बहीण योजनेला उल्लेख करू नका, असे सांगितले आहे. जर उल्लेख केला, तर घरी बसावे लागेल, याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच आणि २१०० रुपये कधी देणार हे विचारणारच, असे ठामपणे म्हटले आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख मी करणारच. निवडणूक लढवताना त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची थाप मारली होती. तशीच थाप राज्यातील माझ्या बहिणींना मारली आहे. १५०० रुपयांचे २१०० रुपये कधी करणार, हा विषय मी काढणारच. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल, तर या महिन्यापासून किंवा पुढील महिन्यात नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांची भेट वर्षभराची भाऊबीज म्हणून सुरू करावी. २१०० रुपये कधी देणार, हा प्रश्न मी त्यांना विचारणारच. जर देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपये नाही दिले, तर त्यांनाच घरी बसावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दोन महिन्यांत वसुली अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अशा ज्या कुणी सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत त्यांच्याकडून वसुली केली जाईल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले. १२ हजार पुरुषांची लाभार्थीची नावे समोर आली आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र, बऱ्याच महिलांनी सुरुवातीला त्यांच्या नावाने बँक खाते नसल्यामुळे घरातील पुरुषांचे बँक खाते दिले. त्यांची नावे कपात केली जाणार नाहीत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.