Uddhav Thackeray Interview: देशाच्या राजकारणात किंवा महाराष्ट्रात सत्ता आणि पैशांचा अतिरेकी वापर सुरू आहे. यामुळे ज्यांना तुम्ही घडवले, ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा दिली. आधी आमदार, खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, तुमचे असतील, तुमचे लोक निघून जात आहेत. कालपर्यंत माझ्याबरोबर होता, माझ्या बैठकीला होता, कालपर्यंत माझा जयजयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता. बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता. उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, यांचे २४ तासांत मतपरिवर्तन होते आणि ते निघून जातात. मोहाला बळी पडतात, हे पाहिल्यावर राजकारणाचा उबग येतो का, पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
मला राजकारणाचा नाही, तर राजकारण्यांचा उबग येतो. हे राजकारण नाही. याला मी राजकारण म्हणू शकत नाही. हे जसे बाळासाहेब म्हणायचे, तसे हे गजकर्ण आहे. सत्तेची खाज यांना एवढी सुटते की, जेवढे खाजवाल तेवढे कमी. त्यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाली ना, तरी सोसायटीची निवडणूक असली, तरी माझाच माणूस पाहिजे. दूधसंघ असला, तरी माझाच माणूस पाहिजे, असा खोचक टोला लगावत, आम्ही घडवण्याचे काम केले, बिघडवण्याचे काम कोणी केले पाहा. तुम्ही निवडणुकीचा प्रचार कशासाठी करत आहात. असेच करायचे असेल, तर निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा. प्रचाराला जाऊच नका. काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वत:हून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरे वाटते की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावत आहेत, ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
राजकारणी हिंस्त्र असतात
तुम्ही कॅमरा हातात घेऊन जंगलात जाता आणि प्राण्याचे फोटो काढता. त्यांना आपण जंगली, हिंस्त्र जनावरे म्हणतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. यावर बोलताना, हल्ली जाऊ शकत नाही, जात नाही. हिंस्त्र आणि जंगली जनावरे यांच्यात फरक आहे. जंगली प्राणी म्हणजे हिंस्त्र नाही. राजकारणी हिंस्त्र असतात, जंगली प्राणी नाही. जंगलात कारण नसताना, कोणी कोणावर हल्ला करत नाही. वाघ उगीच कुणावर हल्ला करत नाही. भूक लागली, तरच शिकार करतो. उगीच प्राणी मारून फ्रिजमध्ये ठेवत नाही. परंतु, सत्ता मिळाली, तरी आणखी आमदार, खासदार घ्या. असे वाघ-सिंह करत नाही. हे राजकारण्यांना फोडतात आणि सत्तेच्या शितकपाटात ठेवून देतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, शिवसेना हा एक विचार होता आणि आहे. शिवसेना हे लोहचुंबक आहे, असे बाळासाहेब म्हणायचे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झाला का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या अनेक पिढ्या आजही शिवसेनेसोबत आहेत. कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेने मोठे केले, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठे करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतके करूनही हे संपत कसे नाहीत? शिवसेना जमीनदोस्त होत नाही, कारण शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, म्हणून तुम्ही संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमची मूळे जमिनीच्या खाली गेलेली आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.